मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक फलंदाज म्हणून महानतेकडे वाटचाल करत आहे, असे उद्गार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही दिवसांपूर्वी काढले होते. भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स या ऐतिहासक मैदानात उद्यापासून सुरु होणार आहे. या सामन्यात कोहलीला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ब्रायन लारा या महान खेळाडूंना मागे टाकायची संधी आहे.
लॉर्ड्स या मैदानाला क्रिकेटची पंढरी, असे म्हटले जाते. या मैदानात खेळायचे भाग्य मिळावे, यासाठी प्रत्येक खेळाडू धडपडत असतो. या मैदानात खेळताना शतक झळकावण्याचे स्वप्न प्रत्येक फलंदाज पाहत असतो. पण तेंडुलकर, गावस्कर, लारा या दिग्गज फलंदाजांना या मैदानात एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीने जर या सामन्यात शतक झळकावले तर तो या महान फलंदाजांना मागे टाकू शकतो.
गावस्कर यांनी लॉर्ड्सवर 37.6 च्या सरासरीने 376 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पण लॉर्ड्सवर त्यांना एक शतकही झळकावता आलेले नाही. सचिनच्या लॉर्ड्सवर जास्त धावा झालेल्या नाहीत. सचिनची या मैदानावरची सरासरी 21.67 एवढी आहे आणि त्याने एकूण 195 धावा केल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिनला या मैदानात एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील नाबाद 400 धावांचा विश्ववविक्रम आहे. पण लाराला लॉर्ड्सवर फक्त एकच अर्धशतक झळकावता आलेले आहे. त्यामुळे कोहलीने या सामन्यात शतक झळकावले तर त्याला या दिग्गजांपुढे जाता येईल.