चेन्नई : फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंडविरुद्ध आज शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्या चुकांपासून बोध घेत उतरणार आहे. चूक झाली तर विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमधील स्थान गमवावे लागेल, याची कर्णधार विराट कोहलीला चांगली कल्पना आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक विजयाची धुंदी, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उतरली. आता आगामी तीन लढतींमध्ये भारतासाठी कुठलीही चूक व आत्ममश्गूल असणे धोकादायक ठरू शकते.
दडपणाच्या स्थितीत आपली सर्वोत्तम कामगिरी करणारा कोहली कर्णधार म्हणून आपली छाप सोडण्यास उत्सुक आहे. या सामन्यापासून प्रेक्षक मैदानावर परतणार आहेत आणि भारतीय संघासाठी हे ‘टॉनिक’चे काम करू शकते. भारताला विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन सामने जिंकायचे असून एकही सामना गमवायचा नाही. इंग्लंड संघात जेम्स अँडरसनचे स्थान स्टुअर्ट ब्रॉड घेईल. मोईन अलीचाही डोम बेसच्यास्थानी समावेश करण्यात आला आहे. कोपराच्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर संघाबाहेर आहे. त्याचे स्थान अष्टपैलू ख्रिस व्होक्स घेईल.
चेपॉकची नवी गडद रंगाची खेळपट्टी पहिल्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीच्या तुलनेत वेगळी आहे. ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विनला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळण्याची अपेक्षा आहे. फिट झालेल्या अक्षर पटेलचे खेळणे जवळजवळ निश्चित आहे, पण कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर तो वॉशिंग्टन सुंदरपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो, पण फलंदाजाला झुकते माप दिल्यास हार्दिक पांड्याला संधी मिळू शकते. सुंदर आगामी कालावधीत चांगला अष्टपैलू ठरू शकतो, पण सध्या तरी तिसरा स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून खेळण्याची त्याची क्षमता नाही. कुलदीप चांगला पर्याय आहे, पण संघ व्यवस्थापन सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर संघ व्यवस्थापनाकडे दोन पर्याय होते. पहिला खेळपट्टीवर हिरवळ ठेवण्याचा आणि दुसरा हिरवळ काढून थोडे पाणी टाकत खेळपट्टीला कोरडी होऊ देण्याचा. अशा स्थितीत खेळपट्टी सुरुवातीपासून भंगण्यास सुरुवात होते, पण भूतकाळात असे प्रयोग उलटले आहेत. पुणे येथे २०१७ मध्ये फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पहिल्या दिवशी स्मिथने वर्चस्व गाजवले होते. यजमान संघाला कल्पना नव्हती की, चेंडू किती वळेल. मुंबईमध्ये २०१२ मध्ये केव्हिन पीटरसनने अशाच खेळपट्टीवर १८६ धावा केल्या होत्या. दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंनी त्याचा लाभ घेत भारताला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता.
...तर भारत डब्ल्यू टीसीतून पडेल बाहेर
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी २२७ धावांनी गमावल्यानंतर दुसरा सामना आज शनिवारपासून सुरू होत आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावा लागेल. हा सामना गमावल्यास भारत स्पर्धेबाहेर होईल. न्यूझीलंडने आधीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे भारताला मोठ्या फरकाने पराभूत करणारा इंग्लंड संघ ७०.२ च्या सरासरीने दुसऱ्या स्थानी आहे.
इंग्लंडने भारताला चार सामन्यांच्या मालिकेत ३-१, ३-० किंवा ४-० ने हरविल्यास अंतिम सामना सहज खेळेल. भारत पहिल्या सामन्यात पराभूत होताच ऑस्ट्रेलियालादेखील संजीवनी लाभली. भारत- इंग्लंड मालिकेचा निकाल १-१, २-२ असा राहिल्यास किंवा इंग्लंड २-१ ने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. भारतीय संघ स्वत:च्या मैदानावर खेळत असल्याने मालिकेत २-१ किंवा ३-१ अशा फरकाने बाजी मारणे अपेक्षित आहे. सध्या भारतीय संघ ६८.३ टक्के सरासरीसह चौथ्या स्थानावर आहे.
नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा
नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता असून कोहली प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक असेल. रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कोहलीसोबत दुसऱ्या टोकाकडून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे किंवा ऋषभ पंत यांना मोठी खेळी करावी लागेल.
प्रतिस्पर्धी संघ...
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा,
शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, रिद्धिमान साहा,
शार्दूल ठाकुर.
इंग्लंड : ज्यो रुट (कर्णधार), डोमिनिक सिब्ली, रोरी बर्न्स, ओली पोप, डॅन लारेंस, बेन स्टोक्स, बेन फोक्स, मोईन अली, ख्रिस व्होक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, ओली स्टोन.
Web Title: India vs England 2nd Test Virat Kohlis India seek redemption on rank turner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.