India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय संघाकडून रिषभ पंतनं सर्वाधिक ७८ धावांची खेळी साकारली. तर सलामीवीर शिखर धवन (६७) आणि हार्दिक पंड्या (६४) यांनी अर्धशतकं ठोकली.
IND vs ENG: षटकारांची उधळण! भारत वि. इंग्लंड वनडे मालिकेत आजवरचे सर्वाधिक षटकार
इंग्लंडनं याही सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघाच्या सलामीजोडीनं मैदानात जम बसवत चांगली सुरुवात करुन दिली. रोहित आणि धवन यांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. रोहित आणि धवन यांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनी संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिलं. फिरकीपटू आदिल रशीदनं रोहित शर्माला(३७) त्रिफळाचीत केलं. त्यानंतर शिखर धवनलाही (६७) रशीदनं आपल्या फिरकी जाळ्यात ओढलं. पुढे कर्णधार विराट कोहली (७) देखील मोईन अलीच्या फिरकीवर क्लीनबोल्ड झाला.
भारतीय संघाच्या चांगल्या सुरुवातीनंतरही लागोपाठ तीन फलंदाजांना माघारी धाडण्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंना यश आलं होतं. त्यानंतर रिषभ पंतनं कोणताही दबाव निर्माण न होऊ देता आपल्या आक्रमक खेळीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रिषभनं केवळ ६२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या साथीनं ७८ धावांची खेळी साकारली. हार्दिक पंड्यानं चांगली साथ देत ४४ चेंडूत ६४ धावा कुटल्या.
IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!
गेल्या सामन्यात शतकी कामगिरी करणारा केएल राहुल या सामन्यात अपयशी ठरला. लिव्हिंगस्टनच्या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरनं २१ चेंडूत ३० धावा केल्या. कृणाल पंड्यानं ३४ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं.