भारतीय संघानं रविवारी इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय प्राप्त करत मालिका २-१ नं जिंकली. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रिषभ पंतनं कालच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदांचा खरपूस समाचार घेत ११३ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी साकारली. यात १६ खणखणीत चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रिषभ पंतच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या शतकानंतर भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग यानं केलेलं ट्विट चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे.
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे आधी युवराज सिंग आणि रिषभ पंत यांच्यात चर्चा झाल्याची माहिती युवराजच्या ट्विटमधून समोर आली आहे. "त्या ४५ मिनिटांच्या संवादाचा फायदा झालेला दिसतोय. वेल प्लेड रिषभ पंत. अशाच पद्धतीनं तुझ्या इंनिंगला गती देत राहा. हार्दिक पंड्याचा खेळ पाहतानाही आनंद झाला", असं ट्विट युवराज सिंग यानं केलं आहे.
रिषभ पंतनं देखील डावखुरा आणि युवाराज सारखाच आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे युवराजनं टिप्स दिल्या अन् रिषभ पंतनं शतक साजरं केलं अशा चर्चा आता सोशल मीडियात सुरु झाल्या आहेत. रिषभ पंतनं इंग्लंड दौऱ्यात वाखाणण्याजोगी कामगिरी करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. बेजबाबदार आणि अनावश्यक फटके मारण्यासाठी रिषभ पंतवर याआधी अनेकदा टीका झाली आहे. पण रिषभनं आता जबाबदारीनं खेळणं सुरू केलं आहे. याचेच परिणाम त्याच्या खेळीतून सर्वांना पाहायला मिळत आहेत.
रिषभ पंतच्या शतकीय खेळाच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंडनं दिलेलं २६० धावांचं आव्हान सहज गाठलं. भारताच्या ७२ धावांवर चार विकेट्स पडल्या होत्या. संघाच्या कठीण काळात रिषभ आणि हार्दिक यांनी जबाबदारीनं फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी महत्वपूर्ण ठरणारी १३३ धावांची भागीदारी रचली. हार्दिक पंड्यानं ५५ चेंडूत ७१ तर पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावा केल्या. हार्दिक पंड्या ३६ व्या षटकात बाद झाला. पण पंत खेळपट्टीवर अखेरपर्यंत टिकून राहिला आणि संघाला विजय प्राप्त करुन दिला.