India vs England 3rd Test : पहिला डाव ११२ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडच्या संघाकडून रडीचा डाव झालेला पाहायला मिळाला. बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) शुबमन गिलचा स्लीपमध्ये झेल टीपल्याची अपील केली. पण, तिसऱ्या पंचांनी गिलला नाबाद दिले आणि त्यानंतर कर्णधार जो रुट व स्टुअर्ट ब्रॉड यांनी मैदानावरील पंचांशी हुज्जत घातली. पण, स्टोक्सनं तो झेल सोडल्याचे स्पष्ट दिसत होते आणि त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि माजी सलामीवीर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी स्टोक्सचा समाचार घेतला. नेटिझन्सनीही त्याला झोडपले. गावस्कर यांनी तर सामन्यानंतर भेट असा थेट इशाराच कॉमेंट्री करताना दिला.
अक्षर पटेलने केले विक्रमभारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला. स्टुअर्ट ब्रॉडची विकेट घेत अक्षर पटेलनं या कसोटीतही पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. डे नाईट कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय, तर जगातला सहावा फिरकी गोलंदाज ठरला आहे. डे नाईट कसोटीत इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी ( वि. बांगलादेश, २०१९) पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत डावात पाच विकेट्स घेणारा अक्षर पटेल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी नरेंद्र हिरवाणी (Narendra Hirwani, 1988) आणि महोम्मद निसार ( Mohammad Nissar, 1933) यांनी हा पराक्रम करून दाखवला होता. ३२ वर्षानंतर भारतीय गोलंदाजाकडून असा पराक्रम झाला.
डे नाईट कसोटीतील ही फिरकीपटूची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. देवेंद्र बिशू ( ८/४९ वि. पाकिस्तान, २०१६-१७) याचा पहिला क्रमांक येतो. पाकिस्तानच्या यासीर शाहनं २०१७-१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध १८४ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
sभारतीय फिरकीपटूंनी आजच्या सामन्यात ६४ धावा देत ९ विकेट्स घेतल्या. कसोटीच्या एका डावात भारतीय फिरकीपटूंनी ८ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेत सर्वात कमी धावा देण्याची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.