नॉटिंगहॅम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूने लागला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची पुन्हा कसोटी लागणार आहे. मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत प्रयोग करण्याचे सत्र कायम राखले आहे. कर्णधार विराट कोहलीचा हा प्रयोग किती यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ट्रेंट ब्रिजमध्ये विजय नोंदवून मालिका वाचविण्याची भारतासाठी ही अखेरची संधी असेल. एडबॅस्टन येथे ३१ धावांनी आणि त्यानंतर लॉर्ड्सवर एक डाव व १५९ धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दोन्ही सामने मिळून साडेपाच दिवसांच्या खेळात ०-२ ने माघारल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना संघ संयोजन सुधारण्याचा शहाणपणा सुचले आहे. त्यांनी २० वर्षांच्या रिषभ पंतला या सामन्यात संधी दिली आहे व कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 291 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला.
सलामीच्या फलंदाजांचे अपयश हे भारतासाठी डोकेदुखी ठरले आहे. त्यात विराटने पुन्हा प्रयोग केला आहे. लॉर्ड्स कसोटीत डोन्ही डावांत भोपळाही फोडू न शकलेल्या मुरली विजयला त्याने संघाबाहेर केले आहे. त्याच्या जागी त्याने पुन्हा एकदा शिखर धवनवर विश्वास दाखवला आहे. गोलंदाजीत कुलदीप यादवच्या जागी जस्प्रीत बुमराला स्थान देण्यात आले आहे.