India vs England 3rd Test ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर कधी होणार याची उत्सुकता आहे. विराट कोहली तिसऱ्या व चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पाचव्या कसोटीतही त्याच्या खेळण्यावर संभ्रम आहेच. लोकेश राहुल याचे पुनरागमन निश्चित असले तरी रवींद्र जडेजाबाबत स्पष्टता नाही. अशात मोहम्मद सिराजचे पुनरागमन होतेय, परंतु त्याचवेळी प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) खेळण्यावर सस्पेन्स आहे.
दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ९ विकेट्स घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहने जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून इतिहास रचला. तो कसोटी क्रमवारीत नंबर १ स्थानावर विराजमान झालेला भारताचा पहिलाच जलदगती गोलंदाज बनला. यापूर्वी आर अश्विन, रवींद्र जडेजा व बिशन सिंग बेदी यांनी अव्वल स्थान पटकावले होते. तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन स्थानावर विराजमान होणारा जस्सी हा विराट कोहलीनंतर तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
सततचे क्रिकेट लक्षात घेता जसप्रीतला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. भारतीय संघाला ११ फेब्रुवारीपर्यंत राजकोट येथे एकत्रित येण्याच्या सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे, परंतु यात खेळायचे की नाही, याचा निर्णय बीसीसीआयने आता जसप्रीतवर सोडला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने एक अहवाल निवड समितीकडे सोपवला आहे. त्यात खेळाडूंच्या वर्क लोड नियंत्रणावर भर दिला गेला आहे. त्यामुळेच जसप्रीतने याचा विचार करून तिसरी कसोटी खेळायचे की नाही हे ठरवायचे आहे.
जसप्रीतच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराजवर जलदगती माऱ्याचा भार असेल. त्याला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली गेली होती.