Join us  

India vs England 3rd Test Live: हे लीड्स आहे, कोलकाता नाही!, कमबॅकच्या तयारीत असलेल्या विराटसेनेला नासिर हुसेनने डिवचले 

India vs England 3rd Test Live Update: लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारताला डिवचले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 8:55 AM

Open in App

लंडन - लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात केवळ ७८ धावांत गारद झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात मात्र चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. ३५४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली. (India vs England 3rd Test) दरम्यान, भारतीय फलंदाज चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारताला डिवचले आहे. ही कोलकाता कसोटी नाही, लीड्स आहे, जिंकण्यासाठी भारताला खूप मेहनच करावी लागेल, असे नासिर हुसेन यांनी म्हटले आहे. ( Nasser Hussain says It's Leeds, not Kolkata!)

लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान माऱ्याला थोपवून धरण्यात तिसऱ्या दिवसी यश मिळवले. आतापर्यंत संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेला चेतेश्वर पुजारा ९१ आणि कर्णधार विराट कोहली ४५ धावांवर खेळत होते. तर रोहित शर्माने ५९ धावांची खेळी केली होती. मात्र तरीही भारतीय संघ अद्याप १३९ धावांनी पिछाडीवर पडलेला आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर नासिर हुसेन म्हणाले की, लीड्सच्या मैदानात विजय मिळवण्यासाठी भारताला अजून खूप मेहनत करावी लागेल. ही कोलकाता कसोटी नाही जिला भारतीय संघ जिंकू शकेल. २००१ मध्ये कोलकात्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात २७४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर फॉलोऑन स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने नंतर मोठी आघाडी घेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

नासिर हुसेन म्हणाले की, भारताला लीड्स कसोटी वाचवण्यासाठी चौथ्या दिवशी खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. भारतीय संघाला या समान्यात विजय मिळवायचा असल्यास पिछाडी भरून काढून वर अजून १५० धावा बनवाव्या लागतील. ही बाब एवढी सोपी नाही. लक्षात ठेवा हे कोलकाता नाही जिथे पाचव्या दिवशी चेंडू फिरकी घ्यायला सुरुवात करेल. तर ही लीड्सची खेळपट्टी आहे. ही दिवसागणिक फलंदाजीसाठी अधिकाधिक सोपी होत जाईल. त्यामुळे येथे इंग्लंडला नमवण्यासाठी खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची गरज आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या हार न मानण्याच्या वृत्तीचेही नासिर हुसेन यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, भारतीय संघ हार न मानणारा संघ आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवशी त्यांनी हेच केले. लोक म्हणत होते रोहित शर्मा इंग्लंडमध्ये फलंदाजी करू शकत नाही. मात्र त्याने सर्वांना चुकीचे ठरवले. चेतेश्वर पुजारावर खूप दबाव होता. मात्र त्याने गरजेच्या वेळी धावा जमवल्या. त्यासाठी मी समाधानी आहे. विराट कोहलीच्या बॅटमधूनही धावा निघत नव्हत्या. मात्र त्यानेही. चांगली फलंदाजी केली. मात्र आताही भारताला सामना जिंकण्यासाठी खूप चांगला खेळ करावा लागेल.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघचेतेश्वर पुजाराविराट कोहलीइंग्लंड
Open in App