Join us  

IND vs ENG 3rd Test : भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडला झोडले; उभ्या केल्या मालिकेतील सर्वाधिक धावा

India vs England 3rd Test Live Updates Day 2 - भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांनी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 1:23 PM

Open in App

India vs England 3rd Test Live Updates Day 2 ( Marathi News ) :   भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांनी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीने भारतीय फलंदाजांना बळ दिले आणि त्यानतंर पदार्पणवीर सर्फराज खानच्या आक्रमक फटकेबाजीने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या अर्ध्यातासात भारताला दोन धक्के बसले खरे, परंतु आर अश्विन व पदार्पणवीर ध्रुव जुरेल यांची जोडी जमली. 

बॅटिंगला न येताच इंग्लंडच्या झाल्या ५ धावा; आर अश्विनच्या चुकीवर अम्पायरचा कठोर निर्णय

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तासाभरात तीन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल ( १०), शुबमन गिल ( ०) व रजत पाटीदार ( ५) हे ३३ धावांवर माघारी परतले होते. रोहित शर्मा व रवींद्र जडेजा या सीनियर्सनी डाव सावरला आणि २०४ धावांच्या विक्रमी भागीदारीसह इंग्लंडच्या हातून सामना खेचून नेला. रोहित १९६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावांवर झेल बाद झाला. सर्फराजने चांगली फटकेबाजी करून ६६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६२ धावा चोपल्या. दुर्दैवाने तो रन आऊट झाला. आर अश्विन व ध्रुव जुरेल यांनी ७७ धावांचे योगदान देऊन भारताला या मालिकेतील सर्वाधिक धावसंख्या उभारून दिली.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात जेम्स अँडरसनने भारताला धक्का देताना नाईट वॉचमन कुलदीप यादवला ( ४) माघारी पाठवले. जो रुटच्या गोलंदाजीवर शतकवीर रवींद्र जडेजा फसला आणि रुटच्या हातात सोपा झेल दिला. जडेजा २२५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११२ धावांवर बाद झाला. त्यानंतर पदार्पणवीर ध्रुव व आर अश्विन यांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही सेट जोडी तोडण्याची संधी होती, परंतु बेन स्टोक्सने जुरेलचा झेल टाकला. पण, त्याची भरपाई आर अश्विनच्या ( ३७) विकेटमधून केली. रेहान अहमदने ही आठव्या विकेटसाठीची ७७ ( १७५ ) धावांची भागीदारी तोडली.

जुरेलने नंतर आक्रमक फटकेबाजी सुरू केली आणि त्याचा षटकार पाहून रोहितनेही कौतुक केले. पण, रेहानने टाकलेल्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिरक्षकाला झेल देऊन बसला. जुरेल ४६ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने २६ धावा जोडल्या आणि भारताचा पहिला डाव ४४५ धावांवर संपुष्टात आला.  मोहम्मद सिराजचा गुडघा दुखत असूनही तो मैदानावर उभा राहिला होता. टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या गुडघ्यावर आदळला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनजसप्रित बुमराहरवींद्र जडेजा