India vs England 3rd Test Live Updates Day 2 - भारतीय संघाला धक्क्यांमागून धक्के मिळताना पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कारणामुळे विराट कोहलीने संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलही दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. त्यात आजच कसोटीतील ५०० विकेट्स पूर्ण करून इतिहास रचणारा आर अश्विन तातडीने घरी परतला आहे. त्यामुळे भारताला उर्वरित कसोटीत १० खेळाडू व १ बदली खेळाडूसह खेळावे लागणार आहे.
BCCI ने दिलेल्या माहितीनुसार अश्विनने कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या कुटुंबात वैद्यकिय इमर्जन्सी आल्याने त्याला ही माघार घ्यावी लागली आहे. या कठीण काळात बीसीसीआय आणि संपूर्ण टीम त्याच्यासोबत आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
"खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोर्डाने अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. ही त्याच्यासाठी आव्हानात्मक वेळ आहे. बोर्ड आणि संघ अश्विनला आवश्यक ती मदत करत राहील,'' असेही बीसीसीआयने म्हटले.
नेमकं कारण आलं समोर..आर अश्विनची आई आजारी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. आर अश्विन राजकोटहून थेट हॉस्पिटलमध्ये गेला असल्याचे माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.