India vs England 3rd Test Live Updates Day 2 - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला धक्क्यांमागून धक्के मिळताना पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कारणामुळे सुरुवातील पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेणाऱ्या विराट कोहलीने संपूर्ण मालिकेकडेच पाठ फिरवल्याची दिसली. त्यात दुखापतीचे ग्रहण आहेच. लोकेश राहुलला दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीला मुकावे लागले. त्यामुळे युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. त्यात आता स्टार फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याने अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारताला उर्वरित कसोटीत १० खेळाडू व १ बदली खेळाडूसह खेळावे लागणार आहे. आर अश्विनने आज एक विकेट घेत कसोटी इतिहासात ५०० विकेट्सचा टप्पा गाठला असताना त्याच्या अचानक माघार घेण्याने भारतीय चाहत्यांना धक्का बसला आहे.
फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल खेळ कायम राखताना साडेसहाच्या सरासरीने धावा कुटल्या आणि दिवसअखेर २ बाद २०७ धावांपर्यंत मजल मारली. झॅक क्रॉली ( १५) याची विकेट घेऊन अश्विनने कसोटीत ५०० वी विकेट पूर्ण केली. अनिल कुंबळे यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. पण, अश्विनने २५७१४ चेंडूंत हा टप्पा पार केला. डकेट व ऑली पोप ( ३९) यांनी भारतीय संघाची झोप उडवताना ९३ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने ३५ षटकांत २ बाद २०७ धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवला. डकेत ११८ चेंडूंत २१ चौकार व २ षटकारांसह १३३ धावांवर नाबाद आहे.
अश्विनने का घेतली माघार?BCCI ने दिलेल्या माहितीनुसार अश्विनने कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या कुटुंबात वैद्यकिय इमर्जन्सी आल्याने त्याला ही माघार घ्यावी लागली आहे. या कठीण काळात बीसीसीआय आणि संपूर्ण टीम त्याच्यासोबत आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
"खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोर्डाने अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. ही त्याच्यासाठी आव्हानात्मक वेळ आहे. बोर्ड आणि संघ अश्विनला आवश्यक ती मदत करत राहतील आणि आवश्यकतेनुसार मदत देण्यासाठी त्याच्या संपर्कात आहोत. टीम इंडिया या संवेदनशील काळात चाहते आणि मीडियाच्या समजूतदारपणाची आणि सहानुभूतीची प्रशंसा करते,'' असेही बीसीसीआयने म्हटले.