India vs England 3rd Test Live Updates Day 1 ( Marathi News ) : राजकोट येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी कसोटी खेळली जात आहे आणि पहिल्या सत्रात इंग्लंडने वर्चस्व गाजवले आहे. मार्क वूडच्या भेदक माऱ्याने भारताचे ३ फलंदाज ३३ धावांवर माघारी पाठवले होते, परंतु कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावताना रवींद्र जडेजासह डाव सावरला. लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ३ बाद ९३ धावा झाल्या आहेत. पण, या सामन्यातपूर्वी संघ व्यवस्थापनाने अचानक जलदगती गोलंदाजाला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या सामन्यात भारताने चार बदल केले. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी राजकोट कसोटीत पदार्पण केले, तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा संघात परतले. सिराजला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती, तर जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर होता. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना बाहेर बसवले गेले. मुकेश कुमारबद्दल अपडेट देताना BCCIने सांगितले की, त्याला तिसऱ्या कसोटीच्या संघातून रिलीज करण्यात आले आहे. मुकेश रणजी ट्रॉफी खेळणार आहे आणि तो पुढील रणजी सामना त्याच्या घरचा संघ बंगालसाठी खेळणार आहे. बंगालचा संघ १६ फेब्रुवारीपासून ईडन गार्डनवर बिहार विरुद्ध ब गटात आपला पुढचा सामना खेळणार आहे.