India vs England 3rd Test Live Updates Day 4 : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरुद्ध मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १२२ धावांत तंबूत परतला. पहिल्या डावातील शतकवीर रवींद्र जडेजा याने ५ विकेट्स घेतल्या. या विजयानंतर भारताला ICC ने एक आनंदाची बातमी दिली.
भारताच्या पहिल्या डावातील ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडला ३१९ धावा करता आल्या. पहिल्या डावातील १२६ धावांच्या आघाडीनंतर भारताने दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूंत १४ चौकार व १२ षटकारांसह नाबाद २१४ धावा केल्या. शुबमन गिल ( ९१) व सर्फराज खान ( ६८ ) यांनी धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्क वूड ( ३३) हा दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रवींद्र जडेजाने ४१ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २, जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत सलग दोन पराभव पत्करावे लागले. यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी एडबस्टन व लॉर्ड्स कसोटी गमावली होती.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडने ७५ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले होते. भारत ५९.५२ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आला असून ऑस्ट्रेलियाला ( ५५ टक्के) त्यांनी मागे ढकलले.
Web Title: India vs England 3rd Test Live Updates Day 4 : India moves to 2nd in the WTC points table.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.