India vs England 3rd Test Live Updates Day 4 ( Marathi News ) - राजकोट कसोटीवर भारतीय संघाने राज्य गाजवलेले पाहायला मिळतेय... पहिल्या डावातील १२६ धावांच्या आघाडीनंतर यशस्वी जैस्वालने खणखणीत शतक झळकावले. कौटुंबिक कारणास्तव घरी गेलेला आर अश्विन पुन्हा कसोटी खेळण्यासाठी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. तिसऱ्या दिवशी रिटायर्ट हर्ट झालेला यशस्वी पुन्हा फलंदाजीसाठी पॅड बांधून सज्ज आहे. शुबमन गिलनेही ( Shubman Gill) ९१ धावांची दमदार खेळी केली. कुलदीप यादवने चांगली फलंदाजी करून भारताची आघाडी चारशेपर्यंत नेण्यात हातभार लावला आहे.
दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अचानक माघार घेणारा आर अश्विन ( R Ashwin ) राजकोटच्या दिशेने रवाना झाला आहे. बीसीसीआयनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अश्विन आणि संघ व्यवस्थापनला हे सांगण्यात आनंद होतोय की अश्विन तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळणार आहे, असे बीसीसीआयने सांगितले. भारताला आनंदवार्ता मिळत असताना इंग्लंडकडून DRS मध्ये पुन्हा चुका होताना दिसल्या. भारतालाही एक चूक महागात पडली. शुबमन १५१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ९१ धावांवर रन आऊट झाला. कुलदीपसह त्याची ५५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
नेमकं काय घडलं?६४व्या षटकात टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर कुलदीपने पुढे येऊन फटका मारला आणि एक धावेसाठी कॉल दिला. नॉन स्ट्राईक सोडून शुबमन बराच पुढे आला होता आणि तेव्हा कुलदीपने त्याला माघार जाण्यास सांगितले. बेन स्टोक्सने तोपर्यंत चेंडू हार्टलीच्या दिशेने फेकला. शुबमन डाईव्ह मारून क्रिजपर्यंत पोहोचेपर्यंत हार्टलीने बेल्स उडवल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये नव्वदीत रन आऊट होणारा सहावा फलंदाज
- विनू मंकड - ९६ वि. वेस्ट इंडिज, १९५३
- मोंत्गानहाली जयसिम्हा - ९९ वि. पाकिस्तान, १९६०
- दीलिप वेंगसरकर - ९० वि. श्रीलंका, १९८२
- अजय जडेजा - ९६ वि. वेस्ट इंडिज, १९९७
- महेंद्रसिंग धोनी - ९९ वि. इंग्लंड, २०१२
- शुबमन गिल - ९१ वि. इंग्लंड, २०२४