India vs England 3rd Test Live Updates Day 4 - यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप दिला. राजकोट कसोटीत पुन्हा एकदा त्याने १५० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडून भीमपराक्रम नोंदवला. २३वर्षीय यशस्वीने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांचा विक्रम मोडला.
भारतीय संघाने पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेताना सामन्यावर पकड घेतली. भारताच्या पहिल्या डावातील ४४५ धावांच्या उत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गडगडला. यशस्वी जैस्वाल व शुबमन गिल यांनी २०१ चेंडूंत १५९ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला. शुबमन खेळपट्टीवर उभा राहिला आणि कुलदीप यादवने त्याला चांगली साथ दिली. त्याने शुबमनसह ९८ चेंडूंत ५५ धावा जोडल्या. कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अचानक माघार घेणारा आर अश्विन ( R Ashwin ) पुन्हा मॅच खेळण्यासाठी आल्याने चाहते खूश झाले.
शुबमन १५१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ९१ धावांवर रन आऊट झाला. भारतात एकाच कसोटीत ५० हून अधिक धावा करणारे दोन फलंदाज रन आऊट होण्याची ही तिसरी वेळ ठरली. शुबमनच्या आधी पहिल्या डावात सर्फराज खान ( ६२) रन आऊट झाला होता. १९४६ मध्ये इंग्लंडविरुद्ध विजय मर्चंट ( १२८) व मुश्ताक अली ( ५९) आणि १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध गुंडप्पा विश्वनाथ ( ११२) व मोईंदर अमरनाथ ( ८५) हे रन आऊट झाले होते. यशस्वी व सर्फराज खान या मुंबईच्या फलंदाजांची चांगली जोडी जमली आणि दोघांनी शैलीला साजेशी फटकेबाजी केली.
तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने ११८ धावा जोडल्या. भारताच्या एकूण ४ बाद ३१४ धावा झाल्या असून त्यांनी ४४० धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतात दोनवेळा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा यशस्वी हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला. त्याने विशाखापट्टणम येथे २०९ धावा केल्या होत्या. २३ वर्षीय यशस्वीने कसोटीत ३ वेळा १५० हून अधिक धावा केल्या आणि इतक्या कमी वयात हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला फलंदाज बनला. त्याने सचिन तेंडुलकर ( २) व विनोद कांबळी ( २) यांना मागे टाकले. कसोटी कारकीर्दितील पहिल्या ३ शतकांचे १५०+धावांत रुपांतर करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी जावेद मियाँदाद, अँड्य्रू जोन्स, ब्रायन लारा, माहेला जयवर्धने, मॅथ्यू सिनक्लेअर, ग्रॅमी स्मिथ यांनी हा पराक्रम केला आहे.
यशस्वी २२ वर्ष व ५२ दिवसांचा आहे आणि वयाच्या २४ वर्षांखालील एकापेक्षा जास्त १५०+ वेळा धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या ( २४ वर्ष व ३३६ दिवस) नावावर होता.