India vs England 3rd Test Live Updates Day 4 ( Marathi News ) : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. २३ वर्षीय यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने पुन्हा एक द्विशतक झळकावून विक्रमांचा पाऊस पाडला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका मालिकेत सर्वाधिक २२ षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड आज त्याने नावावर केला.
Record Breaker : यशस्वी जैस्वालने १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कधी न घडलेला विक्रम नोंदवला
इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळून भारताने १२६ धावांची आघाडी घेतली. त्यात दुसऱ्या डावात ४३० धावांची भर घालून भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूंत १४ चौकार व १२ षटकारांसह नाबाद २१४ धावा केल्या. शुबमन गिलने ९१ आणि सर्फराज खानने नाबाद ६८ धावा केल्या. रोहितने दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. १८७७ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला गेला आणि १४७ वर्षांच्या इतिहासात एकाच कसोटी मालिकेत २२ षटकार खेचण्याचा कोणाला न जमलेला पराक्रम यशस्वीने या मालिकेत केला.
एकाच कसोटी मालिकेत दोन द्विशतक झळकावणारा यशस्वी हा विनू मंकड व विनोद कांबळी यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. वयाच्या २२व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५३ षटकार खेचून सुरेश रैनाचा ४९ षटकारांचा विक्रम मोडला. रिषभ पंत ( ४७), सचिन तेंडुलकर ( ४४) व इरफान पठाण ( ४३) यांना त्याने मागे टाकले. कसोटी क्रिकेटच्या एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक १२ षटकारांच्या वसमी अक्रम ( वि. झिम्बाब्वे, १९९६) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. यशस्वी आणि सर्फराज खान यांनी पाचव्या विकेटसाठी १७२ धावा जोडल्या आणि इंग्लंडविरुद्ध कसोटीतील भारताकडून झालेली ही पाचव्या विकेटसाठी चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. मोहम्मद अझरुद्दीन व रवी शास्त्री यांनी १९८४ मध्ये २१४ धावांची विक्रमी भागीदारी केली होती.