India vs England 3rd Test Live Updates Day 1 ( Marathi News ) : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. सर्फराज खान व ध्रुव जुरेल यांचे पदार्पण झाले. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. मुकेश कुमार व अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. मार्क वूडने सुरुवातीच्या षटकांत यशस्वी जैस्वाल ( १०) व शुबमन गिल ( ०) यांना माघारी पाठवले. रोहित शर्माला रोखण्यासाठी कर्णधार बेन स्टोक्सने डाव्या बाजूला ४ खेळाडू उभे केले होते आणि गोलंदाज त्याला बाऊन्सर टाकून पूल मारण्यास प्रोत्साहित करताना दिसले. दरम्यान, रजत पाटीदार ( ५) याने पुन्हा संधी गमावली आणि टॉम हार्टलीला विकेट दिली. भारताने ३३ धावांत ३ विकेट्स गमावल्या.
भारताकडून घरच्या मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन वेळा भोपळ्यावर बाद होणारा शुबमन तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी १९५९ मध्ये पॉली उम्रीगर हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि १९७८ मध्ये दिलिप वेंगसरकर हे वेस्ट इंडिजविरुद्ध दोनवेळा भोपळ्यावर बाद झाले होते. शुबमन चौथ्यांदा कसोटीत शून्यावर बाद झाला आणि चारही वेळा इंग्लंडविरुद्ध त्याला अपयश आले. रोहितला २७ धावांवर हार्टलीच्या गोलंदाजीवर जो रूटने स्लीपमध्ये जीवदान दिले.