मुंबई - कर्णधार विराट कोहलीने कधीच एक संघ कायम राखला नाही. त्याने प्रत्येक कसोटी सामन्यात संघात बदलाचे सत्र कायम राखले आणि ट्रेंट ब्रिज कसोटीत त्याची प्रचिती आली. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराटने संघात एक नव्हे तर तब्बल तीन बदल केले. सलामीवीर मुरली विजयला बसवून शिखर धवनला त्याने संधी दिली, तर दिनेश कार्तिक आणि कुलदीप यादव यांच्या जागी अनुक्रमे ऋषभ पंत आणि जस्प्रीत बुमरा यांना संघात स्थान मिळाले.
या बदलात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो यष्टीरक्षक पंत... सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पंतला अखेर कसोटी संघात स्थान पटकावण्यात यश आले. भारताचा तो 291वा कसोटी खेळाडू ठरला. भारत 'A' संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने इंग्लंडच्या भूमीत चार सामन्यांत 63च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने यष्टीमागे 10 बळीही टिपले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 54.5 च्या सरासरीने 1744 धावा आणि 73 बळी आहेत.
पदार्पणातच पंतने आपल्या नावावर एक विक्रम जमा केला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो पाचवा तरूण यष्टिरक्षक ठरला आहे. त्याने 20 वर्ष 318 दिवसांत कसोटी पदार्पण केले. या विक्रमात भारताचा पार्थिव पटेल ( 17 वर्ष 152 दिवस) अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दिनेश कार्तिक ( 19 वर्ष 155 दिवस), बुधी कुंदरन ( 20 वर्ष 91 दिवस) आणि अजय रात्रा ( 20 वर्ष 127 दिवस) यांचा क्रमांक येतो.
विशेष म्हणजे पार्थिवने 2002 मध्ये ट्रेंट ब्रिजवर इंग्लंड संघाविरूद्धच कसोटी पदार्पण केले होते आणि आज पंतनेही तेथेच व त्याच संघाविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. भारताकडून कसोटी खेळण्याचा मान मिळालेला पंत हा 36वा यष्टिरक्षक ठरला आहे आणि पार्थिवनंतर पहिला डावखुरा यष्टिरक्षक आहे.