मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत शतकी खेळी केली. त्याने दुसऱ्या डावात 197 चेंडूंत 10 चौकारांसह 103 धावा केल्या. ख्रिस वोक्सने त्याला पायचीत करत माघारी धाडले. विराटचे कसोटी क्रिकेटमधील हे 23वे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 58वे शतक ठरले. त्याच्या या खेळीनंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी एक अनोखा योगायोग जुळुन आला.
( India vs England 3rd Test: इंग्लंडला ५२१ धावांचे आव्हान; विराट कोहलीचे शतक )
भारतीय संघ या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर आहे आणि नॉटिंगहॅम कसोटीचे पारडे भारताच्या बाजूने आहेत. भारताने यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचा डोंगर उभा केला आहे. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता 23 धावा केल्या आहेत आणि त्यांना दोन दिवस खिंड लढवायची आहे. भारताच्या दुसऱ्या डावात विराटच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या डावात अवघ्या तीन धावांनी त्याचे शतक हुकले होते आणि ती कसर त्याने सोमवारच्या खेळीतून भरून काढली.
( India vs England 3rd Test: विराटची एक खेळी अन् विक्रम, विक्रम, विक्रम... )
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे हे 58वे शतक ठरले. विशेष बाब म्हणजे 2001 मध्ये तेंडुलकरनेही 58वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते आणि तेही इंग्लंडविरूद्ध. त्यावेळीही तेंडुलकरने 103 धावाच केल्या होत्या. अशा या योगायोगाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.