नॉटिंगहॅम - पहिल्या दोन्ही कसोटीत मानहानीजनक पराभवाचा सामना केल्यानंतर मालिकेत आव्हान कायम राखण्याच्या हेतूने भारत शनिवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह उतरणार आहे. मालिकेत मुसंडी मारण्यासाठी संघात काही बदल करण्याची भारताची इच्छा आहे.
ट्रेंटब्रिजमध्ये विजय नोंदवून मालिका वाचविण्याची भारतासाठी ही अखेरची संधी असेल. एजबस्टन येथे ३१ धावांनी आणि त्यानंतर लॉर्ड्सवर एक डाव १५९ धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दोन्ही सामने मिळून साडेपाच दिवसांच्या खेळात ०-२ ने माघारल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांना संघ संयोजन सुधारण्याचा शहाणपणा सुचला.
सर्वांत मोठा बदल २० वर्षांच्या रिषभ पंतचे कसोटी पदार्पण असेल. तो दिनेश कार्तिकचे स्थान घेईल. तो नेटवर सराव करताना दिसला. पंतने इंग्लंड लॉयन्सविरुद्ध प्रथमश्रेणीत तीन अर्धशतके ठोकली आहेत. रुडकी येथे जन्मलेल्या पंतला जेम्स अॅन्डरसन, ख्रिस ब्रॉड आणि सॅम कुरेन यांच्या भेदक माºयास तोंड द्यावे लागेल.
कर्णधार कोहली पाठीच्या दुखण्यातून बरा झाला असून जसप्रीत बुमराहही फिट आहे. रविचंद्रन अश्विन व हार्दिक पांड्या हेही हाताच्या दुखण्यातून सावरले आहेत. भारताने लॉर्ड्सवर दोन फिरकीपटूंसह उतरण्याची चूक केली. त्यावर तोडगा म्हणून संघ संयोजन सुधारण्यावर भर दिला जात आहे.
मुरली विजयने दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध विदेशात दहा डावांत केवळ १२८ धावा केल्या. पण त्याची क्षमता पाहता त्याला पुन्हा संधी शक्य आहे. शिखर धवनलाही संघात कायम ठेवले जाईल, असे संकेत मिळाले आहेत. पण अतिरिक्त फलंदाज उतरविण्याची व्यवस्थापनाची इच्छा नसेल तर धवन- लोकेश राहुल हेच सलामीला येण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय उमेश यादवला पुन्हा बाहेर बसावे लागू शकते. (वृत्तसंस्था)
वातावरण ढगाळ राहणार...
हवामानाच्या अंदाजानुसार सामन्यात सुरुवातीच्या चार दिवसांत ढगाळ हवामान राहील. ही गोष्ट लक्षात ठेवून भारत एका फिरकी गोलंदाजाला संधी देऊ शकतो.
इंग्लंडपुढे देखील संघ निवडीची समस्या आहेच. बेन स्टोक्स याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याने गुरुवारी फलंदाजी आणि गोलंदाजीचा भरपूर सराव केला.
वेगळी खेळपट्टी...
२०१४ च्या तुलनेत ट्रेंटब्रिजची खेळपट्टी पूर्ण वेगळी दिसते. भारताने त्यावेळी ४५७ व ९ बाद ३९१ धावा उभारल्या तर इंग्लंडने ४९६ धावा करताच सामना अनिर्णीत राहिला होता. यंदा स्पोर्टिंग विकेट तयार करण्यात आली आहे.
सामना : भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० पासून
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, कीटन जेनिग्स, जॉनी बेयरेस्टो, जोस बटलर, आॅलिव्हर पोप, मोईन अली, आदिल राशिद, जेमी पोर्टर, सॅम कुरेन, जेम्स अॅन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस व्होक्स आणि बेन स्टोक्स.
Web Title: India vs England 3rd Test will start from Today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.