भारताच्या मालिका विजयात जुरेल ‘ध्रुव’तारा; सलग १७ वी मालिका जिंकली

इंग्लंडवर विजयाची हॅट्ट्रिक; चौथ्या कसोटीत पाच गड्यांनी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 05:32 AM2024-02-27T05:32:00+5:302024-02-27T05:32:37+5:30

whatsapp join usJoin us
india vs england 4rth test: In India's series win, 'Dhruv' star; 17th series win in a row | भारताच्या मालिका विजयात जुरेल ‘ध्रुव’तारा; सलग १७ वी मालिका जिंकली

भारताच्या मालिका विजयात जुरेल ‘ध्रुव’तारा; सलग १७ वी मालिका जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ तंत्राच्या अक्षरश: चिंधड्या उडवून भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सोमवारी पाच गड्यांनी पराभूत करीत मायदेशात सलग १७ वा मालिका विजय नोंदविला. हैदराबादचा पहिला सामना गमविल्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टणम्, राजकोट आणि रांचीत विजय मिळवून पाहुण्या संघाविरुद्ध हॅट्ट्रिक साधली. भारताकडे ३-१ अशी विजयी आघाडी झाली असून पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धर्मशाला येथे ७ मार्चपासून खेळला जाईल.

१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताने कालच्या बिनबाद ४० वरून खेळ सुरू केला.  सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४४ चेंडूंत ३७) आणि कर्णधार रोहित शर्मा (९१ चेंडूंत ५५ धावा) यांनी ८४ धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर रजत पाटीदारही लवकर माघारी परतला. शुभमन गिल  (नाबाद ५२) आणि ध्रुव जुरेल (नाबाद ३९) यांनी ७२ धावांची भागीदारी करीत विजय साकारला.

भारतीय संघ मायदेशात २०१२-१३ ला ॲलिस्टर कूकच्या संघाकडून पराभूत झाला होता. त्यानंतर मात्र मायदेशात ५० पैकी ३९ कसोटी सामने जिंकले.  मागील दोन वर्षांत इंग्लंडसाठी विजयाचा मंत्र ठरलेल्या ‘बॅझबॉल’वर पराभवामुळे सडकून टीका होत आहे. ब्रेंडन मॅक्युलम कोच आणि बेन स्टोक्स कर्णधार बनल्यापासून कुठल्याही स्थितीत आक्रमक खेळ करण्याच्या वृत्तीला ‘बॅझबॉल’ संबोधले जाते. भारताने बॅझबॉलला बोथट ठरविले. याचे श्रेय जाते ते युवा ब्रिगेडला!

वैयक्तिक कारणास्तव विश्रांती घेणारे विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत युवांनी दमदार कामगिरी केली. सरफराज खान, जुरेल, वेगवान गोलंदाज आकाश दीप यांनी संधीचे सोने केले. 

जुरेलने या सामन्यात पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावा केल्या. त्याआधी कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांचे योगदान देत  प्रथम श्रेणीत ९ हजार धावांचा टप्पा गाठला. प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि टॉम हार्टले यांच्या माऱ्यापुढे गिल-जुरेल सावध खेळले, तरीही फिरकी गोलंदाजांना स्वत:वर वरचढ होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. बशीरने या सामन्यात आठ गडी बाद केले.

घरच्या मैदानावर...  
    भारताने १२ वर्षांत सलग १७ मालिका विजय नोंदविले.  हा एक विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर सलग १० मालिका जिंकून दुसरे स्थान मिळविले.
    इंग्लंडविरुद्ध भारताने घरच्या मैदानावर सलग तिसरी मालिका जिंकली. इंग्लंडला २०१६-१७ ला ३-० ने, २०२०-२१ ला ३-१ ने आणि आता ३-१ ने नमविले आहे.
 भारताने याच काळात ऑस्ट्रेलियालादेखील तीनदा नमविले. वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यावर सलग २-२ मालिका विजय नोंदविले. अफगाणिस्तानविरुद्धही एक मालिका विजय मिळविला.
    रांचीत मिळविलेला विजय भारताचा इंग्लंडवर १३५ कसोटींत ३४ वा विजय होता. भारताला प्रतिस्पर्धी संघाने ५१ सामन्यांत नमविले आहे. उभय संघांदरम्यान ५० कसोटी सामने अनिर्णीत सुटले.  भारताने ऑस्ट्रेलियाला १०७ पैकी ३२ कसोटी सामन्यांत नमविले आहे.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव : ३५३ धावा. भारत पहिला डाव : ३०७ धावा. 
इंग्लंड दुसरा डाव : १४५ धावा. भारत दुसरा डाव : रोहित शर्मा झे. फोक्स गो. हार्टले ५५,  यशस्वी जैस्वाल झे. ॲन्डरसन गो. रूट ३७, शुभमन गिल नाबाद ५२, रजत पाटीदार झे. पोप गो. बशीर ००, रवींद्र जडेजा झे. बेयरस्टो गो. बशीर ४, सरफराज खान झे. पोप गो. बशीर ००, ध्रुव जुरेल नाबाद ३९, अवांंतर : ५, एकूण : ६१ षटकांत ५ बाद १९२. बाद क्रम : १-८४, २-९९, ३-१००, ४-१२०, ५-१२० गोलंदाजी :   रूट ७-०-२६-१, हार्टले २५-२-७०-१, बशीर २६-४-७९-३, ॲन्डरसन ३-१-१२-०.

    बेन स्टोक्स, ज्यो रूट आणि जेम्स अँडरसन यांनी भारतात भारताविरुद्ध खेळताना इंग्लंडचा दहावा कसोटी पराभव बघितला. या तिघांनी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे.
    ब्रॅन्डन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स यांच्या इंग्लंड संघाने पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली. तसेच, सलग तीन पराभव स्वीकारण्याचीही त्यांची ही पहिलीच वेळ ठरली.
    चौथ्या डावात १५० पेक्षा अधिकचे लक्ष्य सर करण्याची २०१३ नंतरची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. याआधी २०१३ साली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे १५० पेक्षा अधिकचे लक्ष्य गाठले होते. 
    मायदेशात ३३ वेळा भारताला २०० पेक्षा कमी धावांचे लक्ष्य मिळाले. यापैकी भारताने ३० सामन्यांत विजय मिळवला. ३ सामने अनिर्णीत राहिले. यादरम्यान भारताने एकही सामना गमावला नाही.
    कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्यांदा यष्टिचित झाला, तर या पद्धतीने इंग्लंडविरुद्ध बाद होण्याची ही त्याची दुसरी वेळ ठरली.
    भारताच्या सर्वाधिक कसोटी विजयांच्या साक्षीदारांमध्ये रविचंद्रन अश्विनने (५८ सामने), चेतेश्वर पुजाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. अव्वल स्थानी असलेला सचिन तेंडुलकर भारताच्या ७२ कसोटी विजयांवेळी संघाचा सदस्य होता.

युवांना प्रोत्साहनाची गरज
‘युवा खेळाडूंना सतत सल्ला देण्याची गरज नाही तर चांगली कामगिरी करता यावी यासाठी संधी आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ही फार कठीण मालिका असल्याने विजयाचा आनंद वाटतो. युवा खेळाडूंनी हे आव्हान स्वीकारले आणि विजयात योगदानही दिले. सर्वच युवा चेहऱ्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, याची जाणीव आहेच. प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती चांगली नसेल, मात्र त्यांचे स्थान घेणाऱ्यांनी तितक्याच तोलामोलाची कामगिरी केली, हे नजरेआड करता येणार नाही.’
- रोहित शर्मा, कर्णधार भारत

बशीर, हार्टलीवर गर्व
‘बॅझबॉल युगात पहिल्यांदा मालिका गमवावी लागली, पण मला अनुभवहीन शोएब बशीर आणि टॉम हार्टली यांच्या कामगिरीवर गर्व वाटतो. अनेक चढउतारांची साक्ष ठरलेली ही कसोटी चुरशीची झाली. धावफलकाकडे पाहून वेध घेता येत नाही. आमच्या युवा फिरकीपटूंच्या कामगिरीचा मला गर्व वाटतो.’ 
    - बेन स्टोक्स, कर्णधार, इंग्लंड

Web Title: india vs england 4rth test: In India's series win, 'Dhruv' star; 17th series win in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.