India vs England 4th Test( Marathi News ) : भारतीय संघाने चौथ्या कसोटीसाठी संघात बदल करताना प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) याला विश्रांती दिली गेली. IND vs ENG मालिकेचा दीर्घ कालावधी आणि वर्क लोड लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. रजत पाटीदार, ध्रुव जुरेल व सर्फराज खान यांनी कसोटी पदार्पण केले आणि आता जसप्रीतच्या गैरहजेरीत आणखी एक जलदगती गोलंदाज पदार्पणाच्या तयारीत आहे. रांची येथे २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत २७ वर्षीय गोलंदाज आकाश दीप ( Akash Deep) याचे पदार्पण होण्याची शक्यता आहे.
बंगालचा हा गोलंदाज जसप्रीतच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो. भारतीय संघासोबत सध्या मोहम्मद सिराज, आकाश व मुकेश कुमार असे तीन जलदगती गोलंदाज आहेत. यापैकी सिराजचे संघातील स्थान पक्के आहे आणि दुसऱ्या जागेसाठी आकाशला संधी मिळू शकते. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत. मुकेशला विशाखापट्टणम कसोटीत संधी मिळाली होती, परंतु पहिल्या डावात १२ षटकांत त्याला विकेट घेता आली नाही. दुसऱ्या डावात त्याने शोएब बशीर ही एकमेव विकेट घेतली.
कोण आहे आकाश दीप?आकाशचे वडिल एक शिक्षक होते आणि क्रिकेटसाठी त्यांनी त्याला कधीही पाठींबा दिला नाही. परंतु ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा तो लपून क्रिकेट खेळायचा. २७ वर्षीय आकाशने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या युवा गोलंदाजाने ४ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची किमया साधली. याशिवाय एका सामन्यात १० बळी देखील आकाश दीपने घेतले आहेत. आकाश दीपला २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने २० लाख रूपयांत खरेदी केले होते. त्याने सात सामन्यांत सहा बळी घेतले.
भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप