लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना काही मिनिटांमध्येच सुरु होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघात एक अशी गोष्ट घडणार आहे की जी गेल्या 45 सामन्यांमध्ये घडली नसावी. जवळपास वर्षभरानंतर ही गोष्ट भारतीय संघात पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट नेमकी कोणती, ते तुम्हाला माहिती आहे का...
इंग्लंडने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवले. या तिन्ही सामन्यांत भारतीय संघात बदल करण्यात आले. गेल्या 45 सामन्यांमध्ये भारतीय संघात बदल होत आहेत. विराट कोहलीने नेतृत्त्व सांभाळल्यावर तर आतापर्यंत 38 पैकी सर्वच सामन्यांमध्ये त्याने बदल केले. पण इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना मात्र या गोष्टीला अपवाद ठरू शकतो. कारण या सामन्यात भारतीय संघात कोणतेही बदल होणार नाहीत, असे संकेत दस्तुरखुद्द कोहलीने दिले आहेत.
सामना जिंकल्यावर संघात जास्तकरून बदल करण्यात येत नाहीत. पण तिसऱ्या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला दुखापत झाली होती. त्यामुळे तो चौथ्या सामन्यात खेळणार नाही, असे वाटत होते. पण सामन्यापूर्वी कोहलीने अश्विन पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल पाहायला मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत.