साऊदम्पटन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इशांत शर्माने विक्रमी भरारी घेतली. भारताला या सामन्यात यजमान इंग्लंडचा डाव झटपट बाद करण्याची संधी होती, परंतु मोईन अली आणि सॅम कुरन यांनी इंग्लंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण पहिला दिवस राहिला तो इशांतच्या विक्रमाच्या नावावर...
इशांतने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला पायचीत केले आणि त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली. इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर संपुष्टात आला. अली व कुरन यांनी अनुक्रमे ४० व ७८ धावांची खेळी करून इंग्लंडचा डाव सावरला. इंग्लंडचे ४ फलंदाज अवघ्या ३६ धावांवर माघारी परतले होते. इशांतने रूटला बाद करून कसोटी कारकिर्दीतील २५० विकेटचा टप्पा गाठला. या सामन्यात इशांतने 26 धावा देत २ गडी बाद केले.