Join us  

India vs England 4th Test Live : शुन्यावर बाद होताच अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फॅन्स म्हणाले...

Ajinkya Rahane, India vs England 4th Test Live: आजच्या डावातही शुन्यावर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर त्याच्याबाबत मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 8:31 PM

Open in App

लंडन - भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावातही अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) शुन्यावर बाद झाला. त्याला ख्रिस वोक्सने बाद केले. वोक्सने आधी जडेजाला बाद केले. त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेलाही माघारी धाडले. ( Ajinkya Rahane on target of trolls after out on Zero)

तत्पूर्वी ख्रिस वोक्सने जडेजाला पायचित केल्यानंतर त्याच षटकात अजिंक्य रहाणेविरोधातही पायचितचे जोरदार अपील केले होते. पंचांनीही या अपिलाला दाद देत रहाणेला बाद ठरवले. त्याविरोधात रहाणेने डीआरएस घेतला. यामध्ये चेंडू यष्ट्यांवरून जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे रहाणेला जीवदान मिळाले. मात्र राहणे या संधीचे सोने करू शकला नाही. पुढच्याच षटकात वोक्सने त्याला शुन्यावर माघारी धाडले. ओव्हलच्या मैदानावरील रहाणेचा हा तिसरा भोपळा ठरला.

अजिंक्य रहाणेने या मालिकेतील लॉर्ड्स कसोटीत ६१ धावांची एक उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. मात्र ती खेळी वगळता त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. मालिकेतील आतापर्यंतच्या ७ डावात मिळून रहाणेला केवळ १०९ धावाच जमवता आल्या आहेत. या खराब फॉर्मचा परिणाम त्याच्या कसोटीमधील सरासरीवरही पडला आहे. २०१५ मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीनंतर प्रथमच त्याची सरासरी ४० च्या खाली पोहोचली आहे. दरम्यात मधल्या फळीत रहाणेच्या अपयशाचा फटका या मालिकेत भारतीय संघाला सातत्याने बसत आहे. दरम्यान, आजच्या डावातही शुन्यावर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर त्याच्याबाबत मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. 

एका युझरने लिहिले की, अजिंक्य रहाणेची कसोटी कारकीर्द पॅव्हेलियनच्या दिशेने परतत आहे.  #ThankYouRahane आम्ही तुला मिस करणार नाही. जर रहाणेला पुन्हा संधी मिळाली तर तो करुण नायर सारख्या खेळाडूवर केलेला अन्याय ठरेल. 

एका अजून युझरने लिहिले की, आज रहाणेकडून किमान एका अर्धशतकी खेळीची अपेक्षा होती. खरोखरच निराशाजनक कामगिरी. आता पाचव्या क्रमांकावर हनुमा विवाही किंवा मयांक अग्रवाल यांना संधी देण्याची वेळ आली आहे.

तत्पूर्वी भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर यानेही अजिंक्य रहाणेच्या सुमार कामगिरीवर बोट ठेवले होते. रहाणेची फलंदाजी निराशाजनक झाली आहे. तो बऱ्याचवेळा यष्ट्यांमागे झेल देऊन बाद होत आहे. त्याला मोठी खेळी करण्याची गरज आहे. कारण पुढचे काही कसोटी सामने भारतासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे जाफरने म्हटले होते.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App