India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : भारताने चौथ्या कसोटीत मजबूत पकड घेतलेली पाहायला मिळतेय... १९२ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ४० धावा केल्या आहेत. भारताच्या या यशाचे श्रेय जर कुणी गोलंदाजांना देत असेल तर ते पूर्ण सत्य नक्कीच नाही. पहिल्या डावात गडगडलेल्या भारतीय संघाला ध्रुव जुरेल ( Dhruv jurel) याने सावरले. ७ बाद १७७ वरून त्याने कुलदीप यादवसह ७६ धावा जोडल्या आणि संघाला ३०७ धावांपर्यंत पोहोचवले. इंग्लंडची आघाडी कमी करण्यात ध्रुवचा मोठा वाटा आहे आणि त्याने अर्धशतकानंतर कडक सॅल्यूट ठोकून सेलिब्रेशन केले. पण, त्याने असे का केले? चला जाणून घेऊया...
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ( ७३) आणि ध्रुव जुरेल ( ९०) यांनी भारताला तीनशेपार नेले. ध्रुव जुरेल व कुलदीप यादव ( २८) यांनी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. रांचीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात चेंडू फार उसळी घेताना दिसला नाही आणि तो खालीच राहत होता. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज चाचपडताना दिसले. झॅक क्रॉली ( ६०) व जॉनी बेअरस्टो ( ३०) वगळल्यास इंग्लंडच्या फलंदाजांना पुन्हा अपयश आले. अश्विनने १५.५-०-५१-५ अशी स्पेल टाकली. कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही त्याची ३५वी वेळ आहे आणि त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली. कुलदीपने १५-२-२२-४ अशी स्पेल टाकली. इंग्लंडचा दुसरा डाव ५३.५ षटकांत १४५ धावांवर गडगडला.
१ जानेवारी २००१ रोजी जन्मलेल्या ध्रुवचंद जुरेल याने आग्रा येथील स्प्रिंगल क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या बारकावे शिकले. ध्रुवचे वडील नेम सिंह भारतीय सैन्यात होते आणि १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांनीही पाकिस्तानला पराभूत करण्यात योगदान दिले होते. ध्रुवनेही सैनिक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आठवीत असताना ध्रुवचे क्रिकेटशी नाते जोडले गेले आणि त्याने मागे वळून नाही पाहिले. मग ध्रुवच्या वडीलांनीही आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. या सामन्यापूर्वी वडिलांनी अप्रत्यक्षपणे त्याला सांगितलेले की, एक सॅल्युट तो दिखा दे... त्यांची ही इच्छा ध्रुवने आज मैदानावर अर्धशतक झळकावल्यानंतर पूर्ण केली.