India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel ) याने भारतीय संघाचा डाव सावरला आहे. ७ बाद १७७ धावा अशी संघाची अवस्था असताना त्याने कुलदीप यादवसह ७६ धावा जोडल्या आणि संघाला अडिचशे पार नेले. ध्रुवने त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण करताना कडक सॅल्युट ठोकला...
कुलदीप यादवचा स्वॅग! यशस्वी जैस्वाल मागे टाकले, टीम इंडियाला सावरले
जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५ बाद ११२ वरून ३५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतासमोर आव्हान उभे केले. शोएब बशीर व झॅक क्रॉली यांनी दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताला धक्के दिले. यशस्वी जैस्वाल ( ७३) व शुबमन गिल ( ३८) वगळल्यास भारताचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताची अवस्था ७ बाद १७७ धावा अशी झालेली असताना ध्रुव जुरेल व कुलदीप यादव यांनी खिंड लढवली. दोघांनी आठव्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. रांची येथील कसोटीतील ८व्या विकेटसाठी भारताकडून झालेली ही पहिली अर्धशतकी भागीदारी ठरली. कुलदीप १३१ चेंडूंत २८ धावांवर बाद झाला आणि या डावातील भारताकडून सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला. ध्रुवने ९६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
कोण आहे ध्रुव जुरेल?आग्राच्या ध्रुव जुरेलला युवा आशिया चषक स्पर्धेतील अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय मालिकेत आग्राच्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. १ जानेवारी २००१ रोजी जन्मलेल्या ध्रुवचंद जुरेल याने आग्रा येथील स्प्रिंगल क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या बारकावे शिकले.
ध्रुवचे वडील नेम सिंह भारतीय सैन्यात होते आणि १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांनीही पाकिस्तानला पराभूत करण्यात योगदान दिले होते. ध्रुवनेही सैनिक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आठवीत असताना ध्रुवचे क्रिकेटशी नाते जोडले गेले आणि त्याने मागे वळून नाही पाहिले. मग ध्रुवच्या वडीलांनीही आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.
२०१८ मध्ये यूपीकडून कूच विहार ट्रॉफी खेळताना ११ सामन्यांमध्ये ७६२ धावा केल्या. यामध्ये तीन शतके झळकावली होती. यष्टींमागे त्याने ५१ बळी टिपले होते. त्याच्या चमकदार कामगिरीने यूपी कूच विहारला ट्रॉफी जिंकून दिली. २०१४ मध्ये, अंडर-१७ शालेय राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप ट्वेंटी-२० मध्ये ध्रुवने सहा सामन्यांत चार शतके आणि दोन अर्धशतकांसह ६००हून अधिक धावा केल्या.