India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : फलंदाजीत संयम दाखवणाऱ्या कुलदीप यादवने इंग्लंडला दुसऱ्या डावात गोलंदाजीत हादरे दिले. अम्पायर्स कॉल इंग्लंडसाठी फलदाजी ठरत असताना कुलदीपने ( kuldeep yadav) भारताला दोन मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. त्याने चेंडूला अप्रतिम वळवताना झॅक क्रॉलीचा मिडल स्टम्प उडवला. त्यानंतर अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालेल्या बेन स्टोक्सला त्रिफळाचीत करून इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला.
W,W! आर अश्विनने दोन चेंडूंत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले, अनिल कुंबळेचा मोडला विक्रम
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ( ७३) आणि ध्रुव जुरेल ( ९०) यांनी भारताला तीनशेपार नेले. ध्रुव जुरेल व कुलदीप यादव ( २८) यांनी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली. शोएब बशीरने ११९ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. रोहितने नवा चेंडू आर अश्विनच्या हातात दिला आणि त्याने बेन डकेट ( १५) व ऑली पोप ( ०) यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था २ बाद १९ अशी केली. या दोन विकेटसह घरच्या मैदानावर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनने ( ३५१) चौथ्या स्थानी झेप घेतली. अश्विनने अनिल कुंबळे यांचा ( ३५०) विक्रम मोडला.
पहिल्या डावात भारताला सतावणाऱ्या जो रूटला ( ११) अश्विनने पायचीत करून माघारी पाठवून इंग्लंडला मोठा धक्का दिला. झॅक क्रॉलीने आक्रमक खेळ करताना इंग्लंडला मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली होती. पण, कुलदीप यादवने त्याची विकेट मिळवली. ९१ चेंडूंत ७ चौकारांसह ६० धावा करणाऱ्या क्रॉलीला कुलदीपने त्रिफळाचीत केले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स पायचीत बाद झाला होता, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो नाबाद राहिला. पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्स पायचीत झाला होता, परंतु यावेळी भारताने DRS न घेतल्याने तो वाचला. पण, कुलदीपने टाकलेला चेंडू खूपच खाली राहिला आणि तो यष्टींवर आदळला. इंग्लंडच्या ५ बाद १२० धावा झाल्या आणि त्यांच्याकडे १६६ धावांची आघाडी आहे.