India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारतीय संघाने चौथी कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडच्या १९२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी ८४ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली. पण, हे दोघं माघारी परतले आणि पटापट तीन विकेट्स गेल्या. पहिल्या डावातील नायक ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel ) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून उभा राहिला. त्याला शुबमन गिलने प्रशंसनीय साथ देताना इंग्लंडचा पराभव निश्चित केला.
१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी ८४ धावांची भागीदारी केली. जो रूटने पहिला धक्का देताना यशस्वीला ( ३७) झेलबाद केले. रोहितच्या ( ५५) खेळीला टॉम हार्टलीने ब्रेक लावला. त्यानंतर रजत पाटीदार ( ०) पुन्हा अपयशी ठरला. पाटीदारला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात सपशेल अपयश आले आणि पाचव्या कसोटीवर त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. लंच ब्रेकनंतर शोएब बशीरने पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला ( ४) बेअरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर सर्फराज खान ( ०) गोल्डन डकवर बाद झाला. बिनबाद ८४ वरून भारताची अवस्था ५ बाद १२० धावा अशी दयनीय केली.
यशस्वीच्या विकेटनंतर भारताला २० षटकं चौकार मारता आला नव्हता. शुबमन गिल व ध्रुव जुरेल यांच्या खांद्यावर भारतीय संघाची भिस्त होती. पहिल्या डावात ९० धावांची खेळी करून भारताला सावरणारा ध्रुव पुन्हा एकदा चमकला... त्याने शुबमन सह इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप देताना विजय पक्का केला. शुबमनग १२४ चेंडूंत ५२ धावांवर नाबाद राहिला आणि जुरेलने नाबाद ३९ धावा केल्या. भारताने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १७ वा कसोटी मालिका विजय ठरला. यापूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर २०१२ मध्ये एलिस्ट कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताला शेवटचे पराभूत केले होते.
तत्पूर्वी, इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तारात भारताने ३०७ धावा केल्या. अश्विन ( ५-५१) व कुलदीप ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला.