India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : रोहित शर्माच्या विकेटनंतर भारतीय संघ अडचणीत आलेला दिसतोय.. रोहित व यशस्वी जैस्वाल यांनी ८४ धावांची भागीदारी केल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल असे वाटले होते. पण, जो रूटने पहिला धक्का दिला, त्यानंतर टॉम हार्टलीने रोहितचा काटा काढला. त्यात लंच ब्रेकनंतर शोएब बशीरने पहिल्या २ चेंडूंवर दोन धक्के देताना भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तारात भारताने ३०७ धावा केल्या. अश्विन ( ५-५१) व कुलदीप ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. भारत-इंग्लंड चौथ्या कसोटी रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. जो रूटने पहिला धक्का देताना यशस्वीला ( ३७) झेलबाद केले. रोहितच्या ( ५५) खेळीला टॉम हार्टलीने ब्रेक लावला... हिटमॅन यष्टीचीत होऊन माघारी परतल्याने भारताला ९९ धावांवर दुसरा धक्का बसला. रजत पाटीदार ( ०) बाद झाल्याने भारताला १०० धावांवर तिसरा धक्का बसला.
लंच ब्रेकनंतर शोएब बशीरने पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला ( ४) बेअरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर सर्फराज खान ( ०) गोल्डन डकवर बाद झाला. बिनबाद ८४ वरून भारताची अवस्था ५ बाद १२० धावा अशी दयनीय झाली आहे.