India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटी रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. जो रूटने ही जोडी तोडताना यशस्वीला ( ३७) बाद केले. रोहित कॅप्टन इनिंग खेळताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता आणि त्याने अर्धशतकही पूर्ण केले. पण, टॉम हार्टलीला पुढे जाऊन मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो यष्टिचीत झाला. त्यानंतर रजत पाटीदारही शोएब बशीरच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर माघारी फिरल्याने टीम इंडिया अडचणीत आलेली दिसतेय.
जैस्वालची आणखी एक विक्रमी खेळी, सर डॉन ब्रॅडमननंतर तोच 'यशस्वी'!
आकाश दीप, ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंसोबत आर अश्विन व कुलदीप यादव या सिनीयर्सनी भारतीय संघाला विजयपथावर आणून बसवले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तारात भारताने ३०७ धावा केल्या. ध्रुव जुरेलच्या ९० धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला केवळ ४६ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. अश्विन ( ५-५१) व कुलदीप ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी भारताच्या विजयाचा पाया भक्कम केला. जो रूटने भारताला ८४ धावांवर पहिला धक्का देताना यशस्वीला ( ३७) झेलबाद केले. भारताची चौथ्या डावातील ही २००८ नंतर ( ११७ वि. इंग्लंड, चेन्नई ( वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर) सर्वोत्तम सलामीची भागीदारी ठरली.
रोहित मैदानावर उभा राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. घरच्या मैदानावरी चौथ्या डावात ५०+ धावा करणारा तो भारताचा सहावा कर्णधार ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये विराट कोहलीने ७२ धावा केल्या होत्या, परंतु भारत हरला होता. राहुल द्रविड ( ७१ वि. इंग्लंड, २००६ - ड्रॉ ), सौरव गांगुली ( नाबाद ६५ वि. झिम्बाब्वे, २००० - विजयी), सुनील गावस्कर ( नाबाद ८३ वि. इंग्लंड, १९८२ - ड्रॉ) आणि मन्सुर अली खान पतौडी ( ५३ वि. ऑस्ट्रेलिया, १९६४ - विजयी) यांनी हा पराक्रम केला आहे. रोहितच्या ( ५५) खेळीला टॉम हार्टलीने ब्रेक लावला... हिटमॅन यष्टीचीत होऊन माघारी परतल्याने भारताला ९९ धावांवर दुसरा धक्का बसला. रजत पाटीदार ( ०) बाद झाल्याने भारताला १०० धावांवर तिसरा धक्का बसला.