India vs England 4th Test Live Update Marathi News : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पुन्हा उल्लेखनीय खेळी करताना भारताच्या डावाला आकार दिला होता. जेम्स अँडरसनने तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले होते. पण, यशस्वी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर उभा राहिला आणि त्याने शुबमन गिल, सर्फराज खान यांना सोबतीला घेऊन मैदान गाजवले. पण, इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर याने ४ धक्के देताना इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यात यशस्वीच्याही विकेटचा समावेश राहिला. पण, २३ वर्षाच्या या युवा फलंदाजाने आज नरी काँट्रॅक्टर यांचा ( १९६०-६१) विक्रम मोडला.
यशस्वी जैस्वालचा भीमपराक्रम! १९७८नंतर असा विक्रम प्रथमच झाला, ब्रॅडमन यांच्या पंक्तित स्थान
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( २) तिसऱ्या षटकात माघारी परतला. यशस्वी जैस्वाल व शुबमन गिल यांनी १३१ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. शोएब बशीरने ही जोडी तोडताना गिलला ( ३८) पायचीत केले. रजत पाटीदार आज सावध खेळताना दिसला, परंतु बशीरने त्यालाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले. याहीवेळेस अम्पायर कॉलने इंग्लंडच्या बाजूने निकाल लावला. मागील सामन्यातील शतकवीर रवींद्र जडेजा ( १२) यालाही बशीरने माघारी पाठवले. बशीरने टाकलेला चेंडू बराच खाली राहिला आणि यशस्वीची बॅट फिरण्याआधीच तो यष्टींवर आदळला. यशस्वी ७३ धावांवर ( ११७ चेंडू, ८ चौकार व १ षटकार) त्रिफळाचीत झाला.
यशस्वीने या मालिकेत ६१८ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ८०, १५, २०९, १३, १०, २१४*, ७३ अशी फटकेबाजी केली आहे. या कसोटी मालिकेत त्याने चार वेळा ५०+ धावा केल्या आणि एकाच मालिकेत असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला डावखुरा सलामीवीर ठरला. यापूर्वी नरी काँट्रॅक्टर यांनी १९६०-६१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि सदगोपण रमेशने १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ३ वेळा असा पराक्रम केला होता. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय सलामीवीर म्हणून ४ वेळा ५०+ धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. सुनील गावस्करांनी ५ ( १९७९) वेळा असा पराक्रम केला आहे. एमएल जयसिम्हा यांनी १९६१-६२ मध्ये ४ व गावस्करांनी १९८१-८२ मध्ये ४ वेळा अशी खेळी केली होती.