India vs England 4th Test Live Update Marathi News : आकाश दीपने ( Akash Deep) पदार्पणातच पहिल्या स्पेलमध्ये ३ धक्के देताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. ११२ धावांवर निम्मा संघ माघारी परतल्यानंतर भारत लवकर डाव गुंळालेल असे वाटले होते. पण, आतापर्यंत फॉर्ममध्ये नसलेल्या जो रूटने ( Joe Root ) त्याची पारंपरिक फटकेबाजी करताना शतक झळकावून डाव सावरला. जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स यांची त्याला चांगली साथ मिळत असताना मोहम्मद सिराजने दोन धक्के देऊन दिवसअखेर पुन्हा भारताला पकड मिळवून दिली. इंग्लंडचा डाव आजच गडगडला असता, परंतु भारताने ३ DRS गमावल्याचा फटका त्यांना बसला.
R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी! असा विक्रम जो एकाही आशियाई खेळाडूला जमला नाही
भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवताना इंग्लंडचा निम्मा संघ ११२ धावांवर तंबूत पाठवला. आकाशने ३ विकेट्स घेताना इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. २७ वर्षीय गोलंदाज आकाशने पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकं फेकून २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने काच षटकात बेन डकेट ( ११) व ऑली पोप ( ०) यांना माघारी पाठवले, नंतर ४२ धावा करणाऱ्या क्रॉलीला त्रिफळा उडवला. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला होता, परंतु आर अश्विनने ही जोडी तोडली. अश्विनने बेअरस्टाला ( ३८) पायचीत केले. रवींद्र जडेजाने कर्णधार बेन स्टोक्सला ( ३) बाद करून पाचवा धक्का दिला.
जो रूट आणि बेन फोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना डाव सावरला. भारतात कसोटीत पाहुण्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रूट ( १०७६) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने गॉर्डन ग्रिनीज ( १०४२) व मॅथ्यू हेडन ( १०२७) यांना मागे टाकले आहे. रुट व फोक्स यांनी दुसऱ्या सत्रात भारताला एकही विकेट मिळू दिली नाही. रुटने अर्धशतक पूर्ण करताना फोक्ससह सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी ११३ वी धाव पूर्ण करताच या मालिकेतील इंग्लंडकडून सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. मोहम्मद सिराजने ही भागीदारी तोडली आणि बेन फोक्स ४७ ( १२६ चेंडू) धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन परतला.
सिराजने आणखी एक धक्का देताना टॉम हार्टलीला ( १३) माघारी पाठवले. जो रूटने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा पल्ला ओलांडणारा तो चौथा जलद फलंदाज ठरला. त्याने ४४४ इनिंग्जमध्ये १९ हजार धावा करून रिकी पाँटिंगशी बरोबरी केली. रूटने २१९ चेंडूंत कसोटीतील ३१वे आणि भारताविरुद्धचे १० वे शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध १० कसोटी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला. रूटने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑली रॉबिन्सनला सोबतीला घेऊन ५७ धावा जोडल्या आणि संघाला दिवसअखेर ७ बाद ३०२ धावांपर्यंत पोहोचवले. रूट १०६ व रॉबिन्सन ३२ धावांवर नाबाद राहिला.