साऊदम्टन, भारत विरुद्ध इंग्लंड: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत नवव्या व दहाव्या विकेटने संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिल्याचे पाहायल मिळत आहे. या मालिकेत शेवटच्या दोन विकेटने आत्तापर्यंत २२.२७ च्या सरासरीने ४४६ धावांचे योगदान दिले आहे आणि संघाच्या एकूण धावांपैकी हा वाटा १३.८७% आहे. मागील ५० वर्षांत चारपेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत शेवटच्या दोन विकेटने सर्वाधिक हातभार लावण्याची ही तिसरी वेळ.
आश्चयाची बाब म्हणजे यामध्ये २०१४ च्या भारत- इंग्लंड यांच्यातील कसोटीमालिकेचा समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यावरील त्या मालिकेत शेवटच्या फलंदाजांनी १५.६३% संघाच्या एकूण धावांचा वाटा उचलला होता. या विक्रमात १९८३-८४ च्या भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील मालिका अग्रस्थानी आहे. त्या मालिकेत शेवटच्या दोन विकेटनी १५.७४ % योगदान दिले होते. मागील ५० वर्षांत शेवटच्या दोन विकेटचा एकूण सरासरी वाटा काढल्यास तो ८% इतक येतो.
भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या या मालिकेत शेवटच्या दोन विकेटने पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजानाही अनेक आघाड्यांत तोडीसतोड काम केली आहे. या मालिकेत पहिल्या दोन विकेटचे योगदान ५७४ धावांचे म्हणजेच १७.८५% आहे. शेवटच्या दोन फलंदाजांनी ८ वेळा ३०पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे, तर सलामीच्या जोडीला केवळ ७ वेळाच असे करता आले आहे. भारतासाठी अखेरच्या दोन फलंदाजांचे योगदान हे २८.५७% आहे.