साऊदम्पटनः भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना आजपासून साऊदम्पटन येथे सुरू होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे. त्या विजयामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले असून मालिकेत बरोबरी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पण, इंग्लंडही मालिका विजयासाठी आतुर आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यासाठी विशेष आहे. दोघांनाही या सामन्यात विक्रम करण्याची संधी आहे.
या कसोटीत अनेक विक्रम नोंदवले जाऊ शकतात.. चला जाणून घेऊया त्या विक्रमांबद्दल1) विराट कोहलीला कसोटीतील 6000 धावा पूर्ण करण्यासाठी सहा धावांची आवश्यकता आहे. जर त्याने पहिल्याच डावात त्या केल्या, तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. सचिनने 120 डावांत 6000 धावा केल्या आहेत आणि कोहलीला 119व्या डावात हा पल्ला सर करण्याची संधी आहे. सर्वात जलद 6000 धावा करण्याच्या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन ( 68 डाव) हे आघाडीवर आहेत, तर भारतीयांमध्ये सुनील गावस्कर (117 डाव) यांनी हा मान मिळवला आहे. 2) कर्णधार म्हणून 4000 धावांचे शिखर सर करण्यासाठी कोहलीला 104 धावांची आवश्यकता आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार, तर एकंदर नववा कर्णधार ठरेल. 3) विराट कोहलीने या मालिकेत सहा डावांमध्ये 440 धावा केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यात एका मालिकेत सर्वाधिक 602 धावा करण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. तो मोडण्यासाठी विराटला 162 धावांची आवश्यकता आहे. 4) विराटने साऊदम्पटन कसोटी जिंकल्यास तो नबाव पतौडी यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. पतौडी यांनी 1968 मध्ये आशिया खंडाबाहेर तीन कसोटी विजय मिळवले आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने जोहान्सबर्ग आणि नॉटिंगहॅम कसोटीत विजय मिळवले आहेत.