साऊदम्टन, भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने कसोटी पदार्पणात फलंदाजी आणि यष्टिमागे उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. पण, दुसऱ्या कसोटी पंतच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. साऊदम्पट कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने संयमी खेळ करताना चेतेश्वर पुजाराला साथ दिली. मात्र, 29 चेंडूंचा सामना केल्यानंतर इंग्लंडच्या मोईन अलीने त्याला पायचीत केले.
पंतने 47 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडला होता, परंतु त्याला एकही धाव करता आली नाही. 29 चेंडूंचा सामना केल्यानंतर भोपळाही फोडू न शकण्याचा विक्रम आता पंतच्या नावावर जमा झाला आहे. त्याने भारताचा इरफान पठाण आणि सुरेश रैना यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.