India vs England 5th Test Live updates In Marathi | धर्मशाला: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन यजमान भारताने आधीच मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे अखेरचा सामना केवळ औपचारिकता आहे. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मजबूत स्थान गाठण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या इंग्लिश संघाला अवघ्या २१८ धावा करता आल्या. कुलदीप यादव आणि आर अश्विन यांच्या फिरकीच्या जोरावर यजमानांनी पहिला दिवस गाजवला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या. झॅक क्रॉली (१०८ चेंडू ७९ धावा) वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. पाहुण्या संघाकडून बेन डकेट (२७), ओली पोप (११), जो रूट (२६), जॉनी बेअरस्टो (२९), बेन स्टोक्स (०), बेन फोक्स (२४), टॉम हर्टली (६), मार्क वुड (०) आणि शोएब बशीरने नाबाद ११ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर आर अश्विन (४) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले.
भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे यजमानांना पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यशस्वीने स्फोटक खेळी करत ५७ धावा केल्या, त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. पण शोएब बशीरने युवा खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ८३ चेंडूत ५२ धावा करून नाबाद आहे. त्याला शुबमन गिल (नाबाद २६) साथ देत आहे. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने ३० षटकांत १ बाद १३५ धावा केल्या असून भारतीय संघ ८३ धावांनी पिछाडीवर आहे.
पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आऱ अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.