ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर पराभवाचे ढग दाटू लागले आहेत. ओव्हल मैदानावरही भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना संघाला चांगली सुरूवात करून देता आली नाही. 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या 18 डावांमध्ये भारताच्या एकाही सलामीवीरांना अर्धशतक पूर्ण करता आलेले नाही. धवन, राहुल आणि मुरली विजय या सलामीवीरांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. या तिघांनी 66 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. 1952-53साली घरच्या मैदानावर भारताच्या सलामीवीरांना 16 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते.
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने 51 षटकांत 6 फलंदाज 174 धावांवर गमावले आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 332 धावांचा पल्ला गाठण्यासाठी भारतीय संघाला आणखी 158 धावांची आवश्यकता आहे. भारताने अखेरच्या सत्रात एकूण 121 धावा केल्या, परंतु त्यासाठी त्यांनी पाच विकेट गमावल्या. इंग्लंडचा पहिला डाव 332 धावांत गुंडाळल्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला 6 धावा असताना पहिला धक्का बसला. धवन अवघ्या तीन धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मात्र, राहुल 37 धावांवर माघारी परतला.
भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरली. विराट कोहली (49) वगळता इतर फलंदाज थोड्याफार फरकाने इंग्लिश गोलंदाजीचा सामना करण्यात अपयशी ठरले. विहारी 25 धावांवर, तर जडेजा 8 धावांवर खेळत होते. अँडरसन, स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन, तर ब्रॉड आणि क्युरन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Web Title: India vs England 5th Test: indian openers at their worst patch in 2018 previous record broken
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.