ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. त्यात इशांत शर्माची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्याने 22 षटकांत 10 निर्धाव षटके टाकून 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने सामन्यात कमबॅक केले. 1 बाद 133 अशा मजबूत स्थितीत असलेल्या इंग्लंडचा डाव दिवसअखेर 7 बाद 198 असा घसरला. कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कुकने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली.
पहिल्या दिवसात तीन विकेट घेत इशांतने इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायभूमित सर्वाधिक 43 विकेट घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये 13 कसोटी सामन्यांत 43 विकेट घेतल्या होत्या आणि 5 बाद 125 ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. इशांतला हा पल्ला गाठण्यासाठी 12 कसोटी सामने पुरेसे ठरले. त्याने 18 डावांमध्ये 43 विकेट घेतल्या आहेत. 7 बाद 74 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
इंग्लंडमध्ये यजमानांविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर करण्यासाठी इशांतला केवळ एका बळीची आवश्यकता आहे. कपिल आणि इशांत यांच्यानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक बळी टिपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (36), बिशन सिंग बेदी ( 35) आणि भागवत चंद्रशेखर (31) यांचा क्रमांक येतो.