ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटी - इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला रडकुंडीला आणले. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जोस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी नवव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत नवव्या विकेटसाठी इंग्लंडच्या खेळाडूंकडून झालेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी आहे. रवींद्र जडेजाने 118व्या षटकात ब्रॉडला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.
पहिल्या दिवशी 1 बाद 133 अशा मजबूत स्थितीवरून इंग्लंडचा डाव 7 बाद 198 असा गडगडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे तीन फलंदाज झटपट बाद करून सामन्यावर पकड घेण्याच्या भारतीय संघाच्या मनसुब्यांना बटलर व ब्रॉड या जोडीने सुरूंग लावला. तत्पूर्वी आदिल रशीदने आठव्या विकेटसाठी बटलरसह 33 धावा जोडून दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात करून दिली.
धावफलकावर 214 धावा असताना जस्प्रीत बुमराने रशीदला पायचीत केले आणि ही जोडी फोडली. त्यानंतर तरी भारताचे गोलंदाज इंग्लंडचा डाव गुंडाळतील असे वाटत होते. मात्र, बर्थडे बॉय बटलरने संयमी खेळी करताना ब्रॉडसह इंग्लंडला मोठ्या धावसंख्येकडे कूच करून दिली. बटलरने कसोटीतील 10वे अर्धशतक झळकावताना ब्रॉडसह नवव्या विकेटसाठी 98 धावा जोडल्या.
इंग्लंडच्या नवव्या विकेटच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध केलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. हा विक्रम मॅथ्यू होगार्ड आणि क्रेग व्हाईट यांच्या नावावर आहे. 2002 मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत होगार्ड आणि व्हाईट यांनी नवव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली होती. ओव्हलवरीलही ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. याआधी 1971 सालच्या कसोटीत रिचर्ड हटन आणि डेरेक अंडरवूड यांनी केलेल्या 68 धावा ही नवव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी होती.
Web Title: India vs England 5th Test: Jos Buttler-Stuart Broad make a second highest 9th wicket partnership
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.