India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) पुन्हा एकदा मैदान गाजवले. या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा चोपणाऱ्या यशस्वीने धरमशाला इथेही आक्रमक खेळ केला. इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा कचरा करून त्याने अर्धशतक पूर्ण केले. रोहित शर्मासह त्याने भारताला शतकी भागीदारी करून दिली. तो ५८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला. पण, मोठे विक्रम नावावर नोंदवले.
यशस्वी जैस्वालने ९२ वर्षांत भारतीयांना नव्हते जमले ते केले; सचिन, गावस्कर, कांबळीला मागे टाकले
भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्यामागोमाग जॉनी बेअरस्टो ( २९), बेन डकेट ( २७), जो रूट ( २६) व बेन फोक्स ( २४) यांनी चांगला खेळ केला. कुलदीप यादवने कसोटी पाच ( ५-७२) विकेट्स घेताना कसोटी कारकीर्दित ५० बळींचा टप्पा ओलांडला. सर्वात कमी चेंडूत कसोटीत ५० विकेट्स घेणारा तो भारतीय फिरकीपटू ठरला. १०० वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विन ( ४-५१) व रवींद्र जडेजाने ( १ विकेट) चांगला मारा केला.
रोहितने आक्रमक सुरुवात केली, परंतु यशस्वी थोडा सावध खेळ करताना दिसला. पण, सेट झाल्यावर त्याने रोहितलाही मागे टाकून अर्धशतक पूर्ण केले. शोएब बशीरच्या षटकात यशस्वीने ३ षटकार खेचले. एका प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ( २६ वि. इंग्लंड) षटकारांचा विक्रम त्याने नावावर करताना सचिन तेंडुलकरचा ( २५ वि. ऑस्ट्रेलिया) विक्रम मोडला. त्याने ५७ धावा करून या मालिकेत ७०० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला. एकाच कसोटी मालिकेत ७००+ धावा करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. सुनील गावस्कर यांनी दोन वेळा ( ७७४ वि. वेस्ट इंडिज, १९७१ व ७३२ वि. वेस्ट इंडिज, १९७८-७९) हा पराक्रम केला आहे. यशस्वीच्या ७१२ धावा झाल्या आहेत आणि तो गावस्करांचा विक्रम मोडू शकतो. पण, ५२ वर्षानंतर भारताच्या एखाद्या फलंदाजाने कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा केल्या. आज त्याने विराट कोहलीचा ६९२ ( वि. ऑस्ट्रेलिया) धावांचा विक्रम मोडला.