India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर आघाडी घेतली, परंतु लंच ब्रेकनंतर भारताच्या दोन्ही सेट फलंदाजांना रोखण्यात इंग्लंडला यश आले. २५१ दिवसानंतर गोलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर जेम्स अँडरसनने दुसरा शतकवीर शुबमनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर आलेल्या सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. पड्डिकलने पदार्पणात अर्धशतक झळकावून विक्रम नोंदवला.
इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनाही संघर्ष करावा लागेल असे वाटले होते. पण, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी अगदी सहजतेनं धावा कुटल्या अन् पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. यशस्वी ५९ चेंडूंत ५७ धावा करून माघारी परतला. पण, रोहित व शुबमन गिल ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी आक्रमक फटकेबाजी करताना आपापले शतक पूर्ण केले व भारताला आघाडी मिळवून दिली. लंच ब्रेकनंतर मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. तब्बल २५१ दिवसानंतर त्याने टाकलेला पहिलाच चेंडू भारतीय कर्णधार रोहितचा त्रिफळा उडवणारा ठरला. रोहित १६२ चेंडूंत १०३ धावांवर बाद झाला.
स्टोक्सने टाकलेला चेंडू रोहितला स्तब्ध करणारा होताच, परंतु स्लीपमध्ये उभा असलेला मार्क वूडही अवाक् झाला. पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनने भारताला मोठा धक्का दिला. त्याने १५० चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह ११० धावा करणाऱ्या शुबमनचा त्रिफळा उडवला. पदार्पणवीर देवदत्त पड्डिकलने आक्रमक फटकेबाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. पहिल्या ३० चेंडूंत केवळ ९ धावा करणाऱ्या सर्फराजने पुढील २५ चेंडूंत ४२ धावा कुटल्या आणि ५५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. टी ब्रेकनंतर सर्फराजला बाद करण्यात शोएब बशीरला यश आले. सर्फराज ६० चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर झेलबाद झाला.
देवदत्तने षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. २००९ ( वि. श्रीलंका) नंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. १९६९ नंतर प्रथमच कसोटी पदार्पणात चौथ्या क्रमांकवर फलंदाजी करताना अर्धशतक किंवा शतक झळकावणारा देवदत्त हा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम केला होता.