India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता पाचवी कसोटी जिंकून ११२ वर्षानंतर ०-१ अशा पिछाडीवरून ४-१ असा विजय मिळवणाऱ्या पहिल्या संघाचा मान टीम इंडिया पटकावण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने इंग्लंडचे ३ फलंदाज ३६ धावांवर माघारी पाठवले. पण, या सामन्यात एक असा विक्रम नोंदवला गेला आहे, जो १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात कधी घडला नव्हता.
कर्णधार रोहित शर्मा पाठीत उसण भरल्याने मैदानावर आला नाही. जसप्रीत बुमराह नेतृत्व करताना दिसला आणि त्याने नवीन चेंडू आर अश्विनच्या हाती दिला. अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत इंग्लंडला तीन धक्के दिले. बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप या तिघांना त्याने माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ३६ अशी केली. पण, त्यानंतर १०० वी कसोटी खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो व जो रूट यांनी ५० चेंडूंत ५६ धावा जोडल्या. बेअरस्टोने अश्विनच्या षटकात दोन षटकार खेचले आणि या मालिकेतील हा १०० वा षटकार ठरला.
१८७७ मध्ये पहिली कसोटी खेळली गेली होती. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका मालिकेत १०० षटकार खेचले गेले. पण, यामध्ये टीम इंडियाने सर्वाधिक ७२ व इंग्लंडने ३० षटकार लगावले. भारताकडून यशस्वी जैस्वालने २६ षटकारांची आतषबाजी केली. यापूर्वी २०२३ च्या अॅशेस मालिकेत ७४ षटकार खेचले गेले होते.
कुलदीप यादवने पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकून इंग्लंडला धक्का दिला. ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा करणारा बेअरस्टो पायचीत झाला. इंग्लंडने ४ बाद १०० धावा केल्या आहेत.
Web Title: India vs England 5th Test Live update Day 3 : INDIA vs ENGLAND 2024 TEST SERIES BECOMES THE FIRST SERIES TO COMPLETE 100 SIXES IN 147 YEAR OLD HISTORY
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.