India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : भारतीय संघाने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात मजबूत आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल यांच्या वैयक्तिक शतकं आणि यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान व देवदत्त पड्डिकल यांच्या अर्धशतकाने इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने ही जोडी तोडून ऐतिहासिक भरारी घेतली.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाचा पाया मजबूत केला. त्यानंतर रोहित ( १०३) आणि शुबमन गिल ( ११०) यांनी शतकी खेळी करून संघाला आघाडी मिळवून दिली. रोहित व शुबमन यांनी २४४ चेंडूंत १७१ धावा जोडल्या. त्यापाठोपाठ सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांनी वादळी फटकेबाजी केली आणि १३२ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी केली. ही दोघं बाद झाल्यावर आता डाव गुंडाळता येईल असे इंग्लंडला वाटले, परंतु कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी ९व्या विकेटसाठी दमदार खेळ केला आणि दुसऱ्या दिवसअखेर भारताला ८ बाद ४७३ धावांपर्यंत पोहोचवले होते.
तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात या दोघांनी ४९ धावांची भागीदारी पूर्ण केली, जी या मालिकेतील ९व्या विकेटसाठी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी बेन स्टोक्स व मार्क वूड यांनी हैदराबाद कसोटीत ४१ धावा जोडल्या होत्या. तिसऱ्या षटकात जेम्स अँडरसनने भारताला ९वा धक्का देताना कुलदीपला ३० ( ६९ चेंडू) धावांवर झेलबाद केले. अँडरसनची ही ७०० वी विकेट ठरली. कसोटीत ७०० विकेट्स घेणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. मुथय्या मुरलीधरन ( ८००) व शेन वॉर्न ( ७०८) हे अँडरसनपेक्षा जास्त विकेट घेणारे गोलंदाज ठरले. शोएब बशीरने डावातील ५ विकेट्स पूर्ण करताना भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर गुंडाळला. भारताने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेतली आहे.
Web Title: India vs England 5th Test Live update Day 3 : JAMES ANDERSON BECOMES THE FIRST PACER TO COMPLETE 700 WICKETS IN TEST HISTORY, India's innings ends at 477, with a lead of 259 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.