India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागला. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R Ashwin ) डावात पाच विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली आणि पहिली कसोटी गमावल्यानंतरही या फरकाने मालिका जिंकणारा ११२ वर्षांच्या इतिहासातील हा पहिला संघ ठरला.
कुलदीप यादव ( ५-७२) व अश्विन ( ४-५१) यांनी इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा ( १०३) , शुबमन गिल ( ११०) यांची शतकं आणि यशस्वी जैस्वाल ( ५७), सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांच्या अर्धशतकांनी इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव ( ३०) व जसप्रीत बुमराह ( २०) यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. भारताने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या आणि २५९ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात आर अश्विनने ( ५-७७) पाच विकेट्स घेतल्या. शंभराव्या कसोटीत ९ विकेट्स घेणारा तो मुथय्या मुरलीधरननंतर दुसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून जो रूट अर्धशतकी खेळी करून एकटा भिडला. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर गडगडला आणि भारताने एक डाव व ६४ धावांनी सामना जिंकला. जो रूट ८४ धावांवर बाद झाला.
पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने मालिका जिंकण्याची ही सातवी वेळ असेल. याआधी संघाने १९७२/७३ मध्ये इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. टीम इंडियाने २००१ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध, २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर २०२०/२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०२१ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता.