India vs England 5th Test Live updates In Marathi | धर्मशाला: कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या शतकी खेळीमुळे भारताला आपल्या पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली. दोन्हीही शतकवीर बाद झाल्यानंतर सर्फराज खान आणि देवदत्त पडिक्कल यांनी मोर्चा सांभाळला. कसोटी कारकिर्दीतील तिसरा सामना खेळत असलेल्या सर्फराजने अर्धशतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात हातभार लावला. तो ६० चेंडूत ५६ धावा करून तंबूत परतला. लंच ब्रेकनंतर पहिल्याच चेंडूवर तो शोएब बशीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. जो रूटने एक सोपा झेल पकडला. पहिल्या डावात भारताच्या आघाडीच्या पाचही फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या.
सर्फराज बाद झाला असला तरी पदार्पणवीर पडिक्कलने अर्धशतकी खेळी करून इतिहास रचला. खरं तर १५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारताच्या आघाडीच्या पाचही फलंदाजांनी पहिल्या डावात ५० हून अधिक धावा करण्याची किमया साधली आहे.
सर्फराज बाद झाला (८४.१ षटक) तोपर्यंत भारताची धावसंख्या ४ बाद ३७४ होती. आता रवींद्र जडेजा आणि पडिक्कल खेळपट्टीवर टिकून आहेत. मोठी धावसंख्या उभारून पाहुण्या संघाविरूद्ध चांगली आघाडी घेण्याचे आव्हान यांच्यासमोर आहे. रोहित शर्मा (१६२ चेंडू १०३ धावा) आणि शुबमन गिल (१५० चेंडूत ११० धावा) यांच्या अप्रतिम खेळीमुळे भारताने इंग्लिश संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
इंग्लंडला तंबूत पाठवल्यानंतर यजमानांना पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यशस्वीने स्फोटक खेळी करत ५७ धावा केल्या, त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. पण शोएब बशीरने युवा खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय कर्णधार पहिल्या दिवसअखेर ८३ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. तर शुबमन गिल (नाबाद २६) खेळत होता. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने ३० षटकांत १ बाद १३५ धावा केल्या होत्या.
पहिल्या डावात भारताचे आघाडीचे फलंदाज -
- रोहित शर्मा - शतक
- शुबमन गिल - शतक
- यशस्वी जैस्वाल - अर्धशतक
- सर्फराज खान - अर्धशतक
- देवदत्त पडिक्कल - अर्धशतक (नाबाद)
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या. झॅक क्रॉली (१०८ चेंडू ७९ धावा) वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. पाहुण्या संघाकडून बेन डकेट (२७), ओली पोप (११), जो रूट (२६), जॉनी बेअरस्टो (२९), बेन स्टोक्स (०), बेन फोक्स (२४), टॉम हर्टली (६), मार्क वुड (०) आणि शोएब बशीरने नाबाद ११ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर आर अश्विन (४) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले.
पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आऱ अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
इंग्लंडचा संघ -
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
Web Title: India vs England 5th Test Live updates sarfaraz khan scored 56 runs and first time in 15 years India's top 5 registered a fifty plus score in a test innings, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.