मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेवटचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. आधी हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. मात्र त्यानंतर कसोटी सामनाच रद्द करण्याची घोषणा झाली. भारतीय संघ आपले खेळाडू मैदानावर उतरवण्यास तयार नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे. तसं निवेदन ईसीबीकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. बीसीसीआयसोबतच्या चर्चेनंतर पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं ईसीबीनं म्हटलं आहे.
मालिका विजेता कोण? इंग्लंड की भारत?
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१नं आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही मालिका भारतानं जिंकली आहे का, असा प्रश्न निर्माण उपस्थित होतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी बीसीसीआय आणि ईसीबीच्या निवेदनाची वाट पाहावी लागेल. पाचवी कसोटी खेळवली जाणार का, याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्ड्स मिळून घेतील. जर पाचवी कसोटी खेळवली जाणार असेल तर कधी, याचाही निर्णय दोन्ही बोर्ड्स मिळून घेतील.
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी रद्द; भारतीय संघात कोरोनाच्या शिरकावामुळे निर्णय
शेवटचा सामना पुढल्या वर्षी?
पुढील वर्षी भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. त्याच दरम्यान पाचवी कसोटी खेळवली जाऊ शकते. भारत या मालिकेत २-१ नं आघाडीवर आहे आणि पाचवा कसोटी सामना नंतरदेखील खेळवला जाऊ शकतो, अशी माहिती पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
...तर हातातून मोठी संधी निसटणार
भारतीय संघाशी संबंधित कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला. त्यामुळे यात यजमान संघाची कोणतीही चूक नाही. त्यामुळे आम्हाला विजयी घोषित करा, असा दावा इंग्लंडकडून केला जाऊ शकतो. असं घडल्यास भारताच्या हातून इतिहास रचण्याची संधी निसटेल. कारण १४ वर्षांनंतर भारताला इंग्लंडच्या भूमीत कसोटी जिंकण्याची संधी आहे. त्यामुळेच शेवटची कसोटी पुढील वर्षी खेळवण्याच्या प्रयत्नात बीसीसीआय आहे. जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख आहे. त्यामुळे बीसीसीआयचा शब्द टाळणं ईसीबीला अवघड जाईल.
Web Title: India vs England 5th Test match cancelled when will be the last test match to be played
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.