लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडच्या दौऱ्यावरील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले नव्हते. पण जेव्हा जडेजाला पाचव्या कसोटीत स्थान देण्यात आले तेव्हा त्याने आपल्याला वगळणे ही किती मोठी चूक होती, हे दाखवून दिले आहे.
पहिल्या डावात जेव्हा भारताचे फलंदाज धारातीर्थी पडत होते, तेव्हा जडेजा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला आणि त्याने नाबाद 86 धावांची दमदार खेळी साकारली. जडेजाने यावेळी तब्बल 156 चेंडू खेळत 11 चौकार आणि एक षटकारही लगावला. यावेळी जर जडेजाला फलंदाजांची साथ मिळाली असती तर त्याने आपल्या शतकासह भारताला आघाडीही मिळवून दिली असती. त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही जडेजाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जडेजाला संघाबाहेर बसवणे ही कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन यांची किती मोठी चूक होती, हे आता सर्वांना कळून चुकले आहे.
जडेजाने ही खेळी साकारली नसती तर भारत मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला असता. पण आपल्या फलंदाजीच्या जोरावर जडेजाला करून दाखवलं, असं आता चाहते म्हणत आहेत.