Rohit Sharma Covid 19 Positive, IND vs ENG 5th Test: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी करण्यात आलेल्या चाचणीत तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोनाचा फटका बसला. रोहितची रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये रोहित शर्मा पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट करून याला दुजोरा दिला आहे. इंग्लंडविरूद्धची पाचवी कसोटी १ ते ५ जुलै दरम्यान होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित जर तोपर्यंत खेळण्यास फिट नसेल तर त्याच्या जागी कर्णधारपदाची माळ एका खास खेळाडूच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाची ज्यावेळी घोषणा करण्यात आली त्यावेळी लोकेश राहुलला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. पण राहुलने दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घेतली आहे. तशातच रोहित शर्मादेखील कोविड पॉझिटिव्ह झाल्याचे दिसत आहे. अशा वेळी जर रोहित शर्मा कसोटी सामन्याआधी तंदुरूस्त झाला नाही तर कर्णधारपदाची जबाबदारी थेट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्यावर येण्याची शक्यता आहे. या आधी जसप्रीत बुमराहने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची भूमिका पाडली आहे. अशा परिस्थितीत, रोहितच्या अनुपस्थितीत कसोटी संघाचे नेतृत्व करण्याचा मान बुमराहला दिला जाऊ शकतो.
रोहितच्या प्रकृतीबद्दल बीसीसीआयचे ट्वीट-
'शनिवारी झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) मध्ये कर्णधार रोहित शर्माची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. BCCI चे वैद्यकीय पथक त्याची काळजी घेत आहे', अशी माहिती BCCI ने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून दिली.
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला इंग्लंडसाठी उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली होती. आर अश्विनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला सराव सामन्यातून वगळलं जाण्याचीही शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अश्विन पाचव्या कसोटीसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडला रवाना झाला नाही. तो आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतरच संघात सामील होईल.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा