India vs England 5th Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना उद्यापासून धर्मशाला येथे सुरू होत आहे. भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग ३ सामने जिंकले आणि आता त्यांना ११२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडच्या बॅझबॉलची बरीच चर्चा रंगली होती, परंतु भारताच्या युवा फलंदाजांनी इंग्रजांना चकित केले. यशस्वी जैस्वालने दोन द्विशतक ठोकून मालिकेत चमकला आहे. पण, यशस्वीच्या या आक्रमक खेळीचे श्रेय लाटण्याचा इंग्लंडच्या बेन डकेटकडून प्रयत्न झाला आणि रोहित शर्माने आज त्याला दमदार उत्तर दिले.
हैदराबाद कसोटीत जैस्वालने ८० चेंडूंत ९६ धावा चोपल्या होत्या आणि त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत ७०हून अधिक स्ट्राईक रेटने द्विशतक झळकावले होते. रांची कसोटीतही त्याने ७३ व ३७ धावा केल्या होत्या. पाचव्या कसोटीत तो महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. जैस्वालच्या या आक्रमक खेळीचं श्रेय डकेटने बॅझबॉलला दिले होते. तो म्हणालेला, जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आक्रमकपणे खेळताना पाहता, तेव्हा तुम्हालाही तसेच खेळण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच यशस्वीच्या आक्रमक खेळीचं क्रेडीट आम्हाला मिळायला हवे.''